Wed, Jun 26, 2019 11:53होमपेज › Konkan › खेडमध्ये उत्स्फूर्त मूक मोर्चा

खेडमध्ये उत्स्फूर्त मूक मोर्चा

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:28AMखेड : प्रतिनिधी

सुकीवली येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणार्‍या नराधम सूर्यकांत चव्हाण याला फाशी द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि. 24)सुकीवली अन्याय निवारण समितीतर्फे सुकीवली ग्रामपंचायत ते खेड शहर असा मूक मोर्चा काढण्यात आला. तर शहरात काही संघटनांनी शिवाजी चौक ते पोलिस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढला. यावेळी पोलिस व शासकीय यंत्रणेला यावेळी निवेदने देण्यात आली. 

खेड तालुक्यातील सुकीवली येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर सूर्यकांत चव्हाण याने बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना दि.20 रोजी उघड झाल्यानंतर  जिल्ह्यात  संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर आता नराधम सूर्यकांतला लवकरात लवकर फासावर लटकवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सुकीवली ग्रामस्थांनी एकजुटीने ही मागणी सत्यात उतरेपर्यंत लढा देण्यासाठी सुकीवली अन्याय निवारण समितीची स्थापना केली आहे. 

या समितीच्या वतीने मंगळवार दि.24 रोजी सकाळी 11 वाजता सुकीवली ग्रामपंचायत ते खेड शहर असा निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोर्चात अग्रभागी होते. शहरातील सर्वच विद्यालयांतील हजारो विद्यार्थी व शिक्षकांनी या मोर्चात सहभाग घेतला. 

भरणेनाका येथील मेहता पेट्रोल पंपासमोर मोर्चेकर्‍यांनी मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी व्ही.पी. नांदेडकर यांना दिले. निवेदन स्वीकारून तत्काळ तपास करून कठोर शिक्षा आरोपीला होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन व या संदर्भातून जनतेच्या भावना वरिष्ठांपर्यत पोहोचवू, असे त्यांनी सांगितले. भरणेनाका येथून खेड शहराच्या दिशेने मोर्चा येत असताना तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देण्यात आले. त्या नंतर मूक मोर्चा शिवाजीचौक मार्गे खेड बसस्थानक, वाणीपेठ, बाजारपेठ, तीनबत्ती नाका, खांबतळेमार्गे खेड पोलिस ठाण्यापर्यंत आला. खेड पोलिस ठाण्याच्या प्रांगणात पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांना निवेदन दिले. मोर्चेकर्‍यांनी शांततेत मार्गक्रमण करत अनिकेत शॉपिंग सेंटर येथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले व मोर्चाची सांगता झाली.