Fri, Aug 23, 2019 14:26होमपेज › Konkan › ग्रामसभांवर ग्रामसेवक बहिष्कार टाकणार

ग्रामसभांवर ग्रामसेवक बहिष्कार टाकणार

Published On: Jan 19 2018 1:52AM | Last Updated: Jan 18 2018 10:04PMशृंगारतळी : वार्ताहर

राज्यात काही ठिकाणी ग्रामसभेत ग्रामसेवकांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या व खोटे गुन्हे दाखल करणे, असे प्रकार वाढत चालले असून ग्रामसेवकांना जीव मुठीत घेऊन सभा घ्याव्या लागतात. त्यामुळे 26 जानेवारी रोजी राज्यात सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांवर सर्व ग्रामसेवक बहिष्कार टाकणार असल्याचा आदेश ग्रामसेवकांच्या राज्य ग्रामसेवक युनियनने दिला आहे.
महाराष्ट्रात  काहीठिकाणी ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकांवर झालेल्या मारहाणीचे पडसाद सर्वत्र उमटले असून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने हा आदेश जाहीर केला आहे. रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक संघटनेने या आदेशाचे पालन करण्याचे ठरविले असून या आदेशाच्या प्रती सर्व ग्रामसेवकांना वितरित केल्या आहेत.त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदनही दिले आहे. 

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, 26 जानेवारी रोजी होणार्‍या ग्रामसभा राज्यात प्रचंड वादळी होऊन ग्रामसभेत ग्रामसेवकांना मारहाण करणे, शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी, खोटे गुन्हे, दप्तर पळविणे, प्रोसिडिंग रजिस्टर फाडणे, यासारखे प्रकार वाढत असून ग्रामसेवकांना राज्यात जीव मुठीत घेऊन सभा घ्याव्या लागतात. म्हणून 26 जानेवारीला राज्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामसभांवर बहिष्कार टाकणार आहेत. याबाबत प्रधान सचिव, उपसचिव, विभागीय आयुक्त यांना हा निर्णय निवेदनाद्वारे कळविण्यात आला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

ग्रामसेवक संघटनेतर्फे 1 मे, 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशीही ग्रामसभा घेणे, यापुढे ग्रामसेवक बंद करणार आहेत. या राष्ट्रीय सुट्ट्या असून इतर कर्मचार्‍यांप्रमाणे या सुट्ट्यांच्या आनंद ग्रामसेवकांना घेता येत नाही. या ग्रामसभा अन्य कधीही विहीत मुदती मध्ये घेण्यात याव्यात, असे ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात 26 जानेवारी असून जिल्ह्यातील जवळपास सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन केलेले आहे. काही ग्रामपंचायतींचा ग्रामसभांचा अजेंडाही निघालेला आहे. या पार्श्‍वभूमीवर या सभाच न घेण्याच्या ग्रामसेवकांच्या निर्धारामुळे सर्व ग्रामपंचायती अडचणीत सापडणार आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामसभांवर ग्रामसेवकांना मारहाण होणे असे प्रकार झालेले नाहीत त्यामुळे ग्रामसेवक आपला हा निर्णय मागे घेतील व 26 जानेवारीच्या ग्रामसभा निर्वेधपणे पार पडतील, अशी 
ग्रामपंचायत विभागाच्या अधिकार्‍यांना आशा आहे.