Tue, Jul 16, 2019 09:36होमपेज › Konkan › ताम्हाणेतील चिरे वाहतूक धोकादायक

ताम्हाणेतील चिरे वाहतूक धोकादायक

Published On: Jan 23 2018 10:23PM | Last Updated: Jan 23 2018 10:08PMसंगमेश्‍वर :  वार्ताहर 

ताम्हाने पंचक्रोशीतून सुसाट वेगात सुरू असलेली चिरा वाहतूक सध्या वाहनचालकांसह शाळकरी विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली असून या वाहतुकीवर निर्बंध आणावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. ताम्हाने पंचक्रोशीत धामापूर, सांगवे, तुळसणी भागात चिर्‍याच्या खाणींचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेले काही महिने या खणींवरून चिरा काढण्यास सुरूवात झाली आहे. शासनाची रॉयल्टी भरून या खाणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या खणीतून निघणार्‍या चिर्‍यांची वाहतूक करण्यासाठी दररोज 10 पेक्षा अधिक ट्रक कोसुंब - ताम्हाने - सांगवे मार्गावर अनेक फेर्‍या मारतात. चिरे भरलेले ट्रक सुसाट वेगात हाकले जातात. या मार्गावर तीव्र चढ, उतार असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत वेगात हाकले जाणारे ट्रक सध्या दुचाकीस्वारांसह पादचार्‍यांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. या मार्गावर ताम्हाने येथे माध्यमिक विद्यालय, तिथून पुढेच अंगणवाडी आणि मराठी शाळा आहे. हा भाग तीव्र उताराचा आहे. 

शाळेच्या दिवसात दिवसभर येथे विद्यार्थ्यांचा वावर असतो तरीही ट्रकचालक आपल्या वेगाला आवर घालत नसल्याने येथे अपघात घडण्याची भीती व्यक्‍त होत आहे. याशिवाय ट्रक मागून जाणार्‍या वाहनांना बाजू न देणे, समोरून एस.टी. आल्यास अरूंद रस्त्यावर खाली न उतरणे असे प्रकारही वाढू लागले आहेत. जे ट्रक वाहतुकीसाठी वापरले जात आहेत त्यातील किती ट्रक सध्या फिरण्यायोग्य आहेत याची आरटीओंनी तपासणी करण्याची मागणी होत आहे. 

गतवर्षी ताम्हाने शाळेसमोरच्या तीव्र उतारावर याच ट्रकमधील एका ट्रकचे पुढचे दोन्ही टायर निखळले होते. हे टायर 300 मीटरपेक्षा अधिक अंतरावर घरंगळत गेले. याचवेळी  विद्यार्थी आणि ग्रामस्थ रस्त्यावर होते. त्यावेळी अनर्थ घडला नसला तरी ट्रक रस्त्यात पडल्याने हा मार्ग दीड दिवस बंद होता. सध्या या मार्गावरून सुरू असलेली सुसाट चिरा वाहतूक अशाच प्रकारच्या अपघातांची नांदी देत आहे. आठ दिवसांपूर्वीच चिरे भरून जाणारा एक ट्रक देवधामापूर आरोग्य केंद्राजवळ रस्त्याच्या मध्यभागी बंद पडला होता. हे ट्रक सध्या परिसरात चिंतेचे कारण ठरले असून संबंधित विभागांनी याची नोंद घेऊन ही वाहतूक आवरावी, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.