Sun, May 26, 2019 14:39होमपेज › Konkan › शिवसेनेची सत्ता आणणार : उद्योगमंत्री सुभाष देसाई

शिवसेनेची सत्ता आणणार : उद्योगमंत्री सुभाष देसाई

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 10:23PMखेड : प्रतिनिधी

महाराष्ट्रावर शिवसेनेची सत्ता आणणे हे एकच लक्ष्य समोर आहे. त्यासाठी राज्यभर शिवसैनिक पेटून उठला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केले. शहरातील द. ग. तटकरे सभागृहात आयोजित शिवसैनिकांच्या विशेष मार्गदर्शन शिबिरात गुरूवारी ते बोलत होते.

शिबिरासाठी युवासेना राज्य कोअर समिती सदस्य योगेश कदम, उपजिल्हा प्रमुख शंकर कांगणे, जि.प. सभापती  अरूण कदम, तालुका प्रमुख राजा बेलोसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ना. देसाई म्हणाले, शिवसेनेची सर्वत्र घोडदौड सुरू आहे. शिवसेनेची पूर्वीची पद्धत एक घाव दोन तुकडे करून जनतेचे प्रश्‍न सोडवणे अशी आहे. परंतु, आता शूर अभिमन्युप्रमाणे चक्रव्युहात अडकून न पडता राजकीय चक्रव्यूह भेदून बाहेर पडण्याची कला शिवसेना संघटनेला अवगत करून देण्यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच सिनेटच्या निवडणुकीत  शंभर टक्के यशस्वी ठरली. नुकत्याच झालेल्या पालघरच्या निवडणुकीत देखील विरोधकांना घाम फोडला. भाजपने जरी पालघरमध्ये विजय मिळवला असला तरी त्यानंतर झालेल्या चार विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये दोन जागा शिवसेनेने जिंकून ताकदीचा प्रत्यय दिला आहे. कोकणातील विधान परिषदेची जागा गेली त्याची खंत आहे. परंतु कोकणच्या विधान परिषद जागेच्या निवडणुकीत शिवसेना विरूद्ध भाजपसह सर्व पक्ष असे चित्र पहायला मिळाले. त्या निवडणुकीतदेखील शिवसेना व युवा सेनेने केलेली कामगिरी निश्‍चितच समाधानकारक आहे. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतदेखील युवा सेनेने सर्वाधिक मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद पदवीधर मतदार संघात निश्‍चितच वाढली आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेना नेतेपद मिळाल्यापासून सर्वाधिक काम विद्यार्थ्यासाठी व शिक्षणप्रेमींसाठी केले आहे. त्यांनी केलेली कामे पदवीधर मतदारांना नक्‍कीच उज्वल भवितव्याचा आशेचा किरण दाखवतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. 

शिवसेनेची शाखा हाच केंद्रबिंदू असून त्या माध्यमातूनच जनतेचे प्रश्‍न आजपर्यंत शिवसेना सोडवत आली व यापुढे देखील तीच यंत्रणा काळानुरूप उभारून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.