Thu, Jun 27, 2019 02:14होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’ची दुकानदारी पहिल्याच निवडणुकीत शिवसेना बंद करणार

‘स्वाभिमान’ची दुकानदारी पहिल्याच निवडणुकीत शिवसेना बंद करणार

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 9:57PMकणकवली : प्रतिनिधी

नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची दुकानदारी कणकवली नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत शहरवासीय आणि शिवसेना बंद करणार आहे. खरे तर राणेंनी स्वाभिमान पक्षाची स्थापना ही दुकानदारीसाठीच केली आहे. मला मंत्री करा मग मी तुमच्या विरोधात बोलणार नाही, नाणार प्रकल्पाला विरोध करायचा आणि मंत्रिपदाची स्वप्ने पहायची, ही दुकानदारी कणकवली शहरातील जनतेला माहिती आहे. दहा वर्षे या न.पं.वर राणेंची सत्ता होती, त्यावेळी कोणी दुकानदारी केली हे कणकवलीकर चांगलेच ओळखून आहेत, असा टोला शिवसेनेचे आ.वैभव नाईक यांनी लगावला. 

काहींनी राजकारणाचा व्यापार चालविला असून नगरपंचायतीला पोटापाण्याचे साधन बनवले आहे, अशी टीका स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी केली होती. त्याला आ.वैभव नाईक यांनी रविवारी येथील विजय भवनमध्ये पत्रकार परिषद घेवून प्रत्युत्तर दिले. नगरसेवक सुशांत नाईक, शहरप्रमुख शेखर राणे, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, भुषण परूळेकर, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, सुजीत जाधव, सुनील पारकर आदी उपस्थित होते.

आ.वैभव नाईक म्हणाले, राणे म्हणतात, कणकवलीत लोक जमिनी देत नसल्याने आरक्षणांचा विकास झाला नाही, मग डीपी रोडच्या आरक्षणाचा विकास कसा झाला? त्याचा फायदा कुणाला झाला? हे कणकवलीतील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. कणकवलीसह जिल्ह्यातील नगरपालिकांना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नगरोत्थानच्या माध्यमातून भरीव निधी दिला आहे. राणे म्हणतात, विकास निधीमध्ये कपात झाली आहे, पण नियोजनच्या अधिकार्‍यांनीच कट झालेला 40 टक्के निधी पुन्हा प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. राज्य नियोजनच्या माध्यमातून 180 कोटी निधी जिल्ह्याला मिळणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर, खा.विनायक राऊत यांच्या माध्यमातून कणकवली शहरातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. त्यामध्ये केंद्रीय उर्जा विकास कार्यक्रमांतर्गत भूमिगत वीज वाहिन्या, बांदकरवाडी येथे कोकण रेल्वे मार्गावर भूयारी मार्ग अशा अनेक कामांचा समावेश आहे.  गेली दहा वर्षे कणकवली नगरपंचायतीमध्ये राणेंच्या पक्षाची दुकानदारी होती. राणे एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी कणकवली शहर शिवसेनेच्या पैठणी कार्यक्रमावर टीका करणे यातच शहर शिवसेनेची ताकद किती आहे हे राणेंना उमगले आहे, असा टोलाही आ.नाईक यांनी लगावला.