Tue, Apr 23, 2019 06:22होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात सेनेचा ‘एकला चलो रे’ चा नारा!

सिंधुदुर्गात सेनेचा ‘एकला चलो रे’ चा नारा!

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 10:51PMसावंतवाडी ः प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘गाव तिथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ या शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार काम सुरू करणार असून ‘एकला चलो रे’ चा नारा घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शंभर टक्के जिंकू, असा विश्‍वास शिवसेनेचे सिंधुदुर्ग -रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीप बोरकर यांनी व्यक्‍त केला. 

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, महिला जिल्हा संघटक सौ.जान्हवी सावंत,अर्चना नाईक, शब्बीर मणियार,एकनाथ नारोजी, मायकल डिसोजा यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री.बोरकर म्हणाले,शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय साधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 50 हजार सदस्य नाेंंदणी करण्यात येणार आहे.जिल्हयात शिवसेनेला चांगले वातावरण असून आगामी विधानसभा मतदारसंघात तिन्ही शिवसेनेचे आमदार निवडून येतील.पालकमंत्री दीपक केसरकर यांचे काम चांगले असून पक्षीय धोरणानुसारच ते काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेची सत्‍ता येईल, असा विश्‍वास जिल्हा संपर्क प्रमुख दुधवडकर यांनी व्यक्‍त केला. ज्या ठिकाणी रिक्‍त पदे आहेत ती रिक्‍त पदे तत्काळ भरली जातील,असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात शिवसेनेचे तीन आमदार! 

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून शिवसेनेचे काम करीत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील एका आमदारावरुन 6 आमदार निवडून आणण्यात यश मिळविले असल्याचे सांगत जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सिंधुदुर्गात दोन आमदारांवरुन तीन आमदार कसे होतील हे पाहून तिन्ही आमदार निवडून आणू, असा विश्‍वास व्यक्‍त केला. आपण देवगड, वैभववाडीसाठी इच्छूक असण्यापेक्षा जिल्ह्यातील तीन आमदार धनुष्यबाणावर निवडून आणण्याची आमची तयारी आहे, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्‍तर देताना सांगितले.