Wed, Jul 17, 2019 20:37होमपेज › Konkan › शिवसेनेच्या दोन नगरसेवकांविरोधात गुन्हा

शिवसेनेच्या दोन नगरसेवकांविरोधात गुन्हा

Published On: Dec 08 2017 1:39AM | Last Updated: Dec 07 2017 10:48PM

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

येथील नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व महिला नगरसेविकांना सभागृहातून बाहेर पडण्यास अटकाव केल्याप्रकरणी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेवक उमेश सकपाळ व मनोज शिंदे यांच्याविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 4 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी स्वत: पोलिसांत फिर्याद दिली आहे. यानुसार सायंकाळी 4.45 वा. ही घटना घडली. न.प.ची सर्वसाधारण आटोपल्यानंतर 15 मिनिटांनी नगराध्यक्षा खेराडे व अन्य महिला नगरसेविका सभागृहाबाहेर पडत होत्या. यावेळी नगरसेवक उमेश सकपाळ यांनी दिलेल्या सूचनेनुसार नगरसेवक मनोज शिंदे यांनी सभागृहाचा मुख्य दरवाजा आतून बंद केला आणि महिला नगरसेवकांना बाहेर जाण्यास अटकाव केला. याप्रकरणी सेनेच्या दोन गरसेवकांविरोधात चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी या संदर्भात पोलिसांनी न. प. बांधकाम सभापती आशिष खातू, नगराध्यक्षा सौ. खेराडे, संजीवनी शिगवण, नुपूर बाचीम  व अन्य महिला नगरसेविकांचे जाबजबाब नोंदविले. सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. गेले दोन दिवस हे प्रकरण चिपळुणात गाजत आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच सेनेच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाल्याने न.प. वर्तुळात चर्चा सुरू आहे.