होमपेज › Konkan › रिफायनरी राष्ट्रीय प्रकल्प होऊच शकत नाही : खा. राऊत

रिफायनरी राष्ट्रीय प्रकल्प होऊच शकत नाही : खा. राऊत

Published On: Apr 22 2018 11:21PM | Last Updated: Apr 22 2018 11:04PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

नाणार रिफायनरी हा राष्ट्रीय प्रकल्प होऊच शकत नाही. तो सौदी राजपुत्र आणि भाजप नेत्यांच्या हितसंबंधाचा परिणाम आहे. महाभयंकर धोकादायक असा हा प्रकल्प स्थानिकांना नको आहे. शिवसेना त्यांच्या सोबत आहे. राज्यच नव्हे, तर देशालाही या प्रकल्पाची गरज नाही, असे सांगून शिवसेना खा. विनायक राऊत यांनी हा प्रकल्प सेना नेते उद्धव ठाकरेच रद्द करू शकतात, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. प्रकल्प विरोधासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाला वस्तुस्थिती सांगितली नाही, असा आरोपही खासदारांनी यावेळी केला.

खा. विनायक राऊत यांनी रविवारी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नाणार रिफायनरीला कडाडून विरोध केला. भाजप नेत्यांची या प्रकल्पात भागीदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाला असलेल्या स्थानिकांच्या प्रखर विरोधाची माहिती केंद्र शासनाला दिली नाही. एकप्रकारे ही लाचारीच म्हटली पाहिजे, अशा आरोपांचा घणाघात खा.राऊत यांनी यावेळी केला.

नाणार रिफायनरीच्या विरोधाची केंद्र शासनाने दखल घेतली नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असा सूचक इशाराही खासदारांनी दिला. या पत्रकार परिषदेला संपर्कप्रमुख विजय कदम, सेना नेते किरण सामंत, विलास चाळके, नगराध्यक्ष राहुल पंडित, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी आदी उपस्थित होते. प्रकल्पाच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी प्रकल्प समर्थक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेबाबत बहिष्काराच्या अफवा पसरवत आहेत. त्यांचा हा कुटील डाव जनता उधळून लावेल, असा विश्‍वास व्यक्त करून खा.राऊत यांनी स्थानिक जनता व सेनेच्या नात्यातील एकजूट फाटाफूट पाडण्याच्या प्रयत्नांनी तुटणार नाही, असे सांगितले.

खा.विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोमवारच्या दौर्‍याचीही माहिती दिली. सकाळी 11 वाजता ठाकरे नाणार ग्रामस्थांना भेटण्यासाठी येणार आहेत. यावेळी रिफायनरी संघर्ष पदाधिकार्‍यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी मच्छिमार संघर्ष समितीच्या सागवे येथे प्रकल्पग्रस्तांशी संवाद सभा होणार असल्याचे खासदारांनी सांगितले.

खासदार असेही म्हणाले की, नाणार रिफायनरी हे केंद्राचे पाप असून त्या पापात मुख्यमंत्रीसुद्धा सहभागी झाले आहेत. प्रारंभी हा प्रकल्प भारतीय कंपन्या, केंद्राचा असेल असे सांगण्यात आले. पण लपूनछपून दिल्लीत करार करण्यात आला. कोकणात अनेक प्रकल्प आणण्याचे षड्यंत्र सुरू आहे. एन्‍रॉनपासून अणुऊर्जा प्रकल्पापर्यंत सर्व प्रकल्प प्रदूषणकारक असताना रिफायनरी सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प कशाला? असा सवालही खा.राऊत यांनी उपस्थित केला.