Wed, Jul 17, 2019 20:41होमपेज › Konkan › काँग्रेस ‘रिफायनरी’च्या विरोधातच

काँग्रेस ‘रिफायनरी’च्या विरोधातच

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 10:59PM

बुकमार्क करा

चिपळूण : प्रतिनिधी

राजापुरातील नाणारमधील बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा कडवा विरोध असून, कोणत्याही परिस्थितीत कोकणच्या विकासाला व सौंदर्याला झळ पोहोचविणारे प्रकल्प स्वीकारले जाणार नाहीत. काँग्रेस पक्ष मोठे जनआंदोलन उभारेल. सरकारने याबाबत भूमिका बदलावी व येथील रिफायनरीच काय, तर कोकणवर कोणतेही प्रदूषणकारी प्रकल्प सरकारने लादू नयेत, असा इशारा कोकणचे सुपुत्र व राज्यसभा खा. हुसेन दलवाई यांनी दिला.

 निसर्गाचा व पर्यावरणाचा जगभरात हेवा केला जातो. परंतु, हे कोकणचे कोकणपण उद्ध्वस्त करण्याचा घाट सातत्याने घातला जात आहे. कोकणातील जमिनी विशेषतः परप्रांतियांनी या पूर्वीच कब्जात घेतल्या आहेत. आता रासायनिक प्रकल्प लादून कोकणच उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. कोकणी जनतेला श्‍वास गुदमरविणारा विकास नकोय, तर आर्थिक स्तर उंचावणारा विकास हवा आहे. रासायनिक प्रकल्पांनी कोकणातील नद्या-नाले, पाणी प्रदूषित केल्याने आधीच येथील मच्छीमार संकटात आहे. त्यातच विकासाच्या नावाखाली येथील गरीब शेतकरी, कष्टकर्‍यांच्या जमिनीही गिळंकृत केल्या जात आहेत. हे एक षड्यंत्र असून याबाबत खा. दलवाई यांनी भाजप सरकारला जबाबदार धरले. काँग्रेस पक्षाचा अशा प्रकल्पांना विरोध आहे. आमच्या पक्षाच्या राजापूरच्या आ. हुस्नबानू खलिफे स्थानिक लोकांबरोबर आंदोलनात सहभागी आहेत, अशी माहिती खा. दलवाई यांनी दिली. 

खा. दलवाई यांनी सेनेवरही टीका केली. मुंबईत सत्तेत राहायचे व कोकणात प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घ्यायची, हा दुटप्पीपणा आहे. शिवसेनेला कोकणच्या विकासाशी काहीही देणे-घेणे नाही. तसे असते तर त्यांनी सत्ता सोडली असती. प्रकल्पाला सेनेचा विरोध हा दिखावू असल्याची टीकाही त्यांनी केली.  ‘पुढारी’ला दिलेल्या मुलाखतीत खा. दलवाई यांनी कोकणचा विकास पर्यटनातूनच होऊ शकतो, असा निर्वाळा दिला. रिफायनरी,  जिंदल किंवा जैतापूर यासारखे प्रकल्प हा दिखाऊ विकास असून खरा विकास पर्यटनाच्या माध्यमातून साधता येऊ शकेल. यासाठी आवश्यक ती दळणवळणाची साधने, पर्यटकांसाठीच्या सोयी -सुविधा, स्थानिक तरूणांना रोजगार व स्वयंरोजगासाठी उत्तेजन द्यायला हवे.

कोकणातील फळ बागायती, एका बाजूला सह्याद्रीची पर्वतरांग, स्वच्छ समुद्रकिनारे, मत्स्य उत्पादन या आधारितच कोकणचा आर्थिक विकास साधता येईल. सरकारने या अजेंड्यावर काम करायला हवे होते. परंतु, सरकारला कोकणच्या विकासाशी देेणे-घेणे नसल्याचे सरकारच्या या भूमिकेतून सिद्ध होते, असा आरोपही त्यांनी केला. कोकणचा विकास काँग्रेसची विचारधाराच साधू शकते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

कार्यकर्त्यांनो, जनतेच्या अपेक्षांना भिडा...
कोकणात काँग्रेसच्या संघटन बांधणीसाठी गतिमान काम केले जात आहे. पक्षाचे प्रभारी विश्‍वनाथ पाटील, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. लवकरच संघटनात्मक नेमणुका जाहीर होतील. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात सामान्य जनतेत चीड आहे. रोजगार, महागाईच्या मुद्यावर सरकारचे अपयश काँग्रेस कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर आणावे व या दोन्ही सरकारविरोधात गावोगावी सामान्य जनतेच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी या पुढील काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भूमिका घ्यावी. केवळ काँग्रेस पक्षच सामान्य जनतेच्या अपेक्षांना भिडू शकतो, असा दावा खा. हुसेन दलवाई यांनी ‘पुढारी’शी बोलताना केला.