Sun, Dec 15, 2019 02:40होमपेज › Konkan › शिवसेना तेथे भ्रष्टाचार : नारायण राणे 

शिवसेना तेथे भ्रष्टाचार : नारायण राणे 

Published On: Mar 31 2019 1:19AM | Last Updated: Mar 31 2019 12:18AM
देवरुख : विशेष प्रतिनिधी

शिवसेना तेथे भ्रष्टाचार व भ्रष्टाचार तेथे बट्ट्याबोळ, लोकांना उल्लू बनविण्याचे काम शिवसेनेद्वारे केले जाते.  मतदारांच्या विश्वासाला सेना कधीच पात्र ठरू शकत नाही. मतदारांनी यापुढे जागे होऊन विचारांचे परिवर्तन करायला हवे, असे मत स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी देवरुख येथील प्रचार मेळाव्यात व्यक्त केले.

शहरातील श्री लक्ष्मी नृसिंह सभागृहात स्वाभिमान पक्षाचे लोकसभा उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारा प्रित्यर्थ हा मेळावा घेण्यात आला. यावेळी राणे यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उडवली. शिवसेना गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मुंबईवर राज्य करीत आहे. मराठी माणसांवर सेना सत्ता काबीज करत आहे. मात्र आज 

मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला आहे. 1966 साली मुंबईत 60 टक्के मराठी माणूस होता. आज मुंबईत 18 टक्के मराठी माणूस राहिला आहे. सेनेची जोपर्यंत मुंबईत सत्ता आहे तोपर्यंत विकासाचे परिवर्तन होणार नाही यांनी असे राणे यांनी सांगितले. स्थानिक सेनेच्या खासदारांने पाच वर्षात लोकसभेत कोकणातले प्रश्न देखील मांडले नाहीत. ज्याला कोकणातील प्रश्नच माहिती नाहीत ते कोकणाचा विकास काय करणार असा प्रश्न देखील राणे यांनी केला.

केंद्रीय मंत्री अनंत गीते, पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी कोणती विकासकामे केली ती सांगावीत. केवळ भगव्याच्या नावाखाली मते मगण्याचे काम शिवसेना करत आहे व हाच त्यांचा धंदा आहे. लोकसभेमध्ये कोकणाचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच वेळ पडल्यास संघर्षाची भूमिका घेणार्‍या  निलेश राणे यांना मते देऊन विजयी करा, अशी हाक राणे यांनी मतदारांना घातली. केवळ कोकणच्या विकासासाठी स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी लोकसभेचे उमेदवार निलेश राणे यांनी देखील खा.विनायक राऊत यांची खिल्ली उडवली.कोणत्याही परिस्थितीत भाजपा विनायक राऊत  यांना मदत करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या सभागृहात ज्या व्यक्तीला बोलता येत नाही. ती व्यक्ती प्रश्न काय सोडवणार? असा प्रश्नही निलेश राणे यांनी उपस्थित केला.

यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदीप कुरतडकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बापू सुर्वे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शेकडो विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी नीलम राणे, रवींद्र नागरेकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.