Mon, Apr 22, 2019 16:08होमपेज › Konkan › खड्डेमय रस्त्यांवरुन सेना व स्वाभिमान आमने-सामने

खड्डेमय रस्त्यांवरुन सेना व स्वाभिमान आमने-सामने

Published On: Aug 27 2018 10:15PM | Last Updated: Aug 27 2018 9:24PMकुडाळ ः शहर वार्ताहर
कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्‍नावरून नगरपंचायतमधील सत्‍ताधारी व विरोधक सोमवारी पंचायत समितीजवळ भर रस्त्यावर आमने-सामनेे आल्याने शाब्दिक खडाजंगी होवून वातावरण तापले. पं.  स. समोरील रस्त्यावरील  खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शिवसेनेने करीत या कामाचा पोलखोल केला. यावेळी रिक्षा संघटनेने या कामावर आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला. अखेर बांधकाम सभापती ओंकार तेली व नगरसेवक राकेश कांदे यांनी हा वाद शांत करण्यासाठी प्रयत्न केला. 
कुडाळ नगरपंचायतीच्या  ताब्यात असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावर सध्या खड्डे पडून अक्षरशः गंभीर दुर्दशा झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये मोटारसायकल घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहनधारकांसह पादचार्‍यांनाही या रस्त्यावरील खड्ड्यांचा  मोठा त्रास सहन करावा लागत आहे.कुडाळ  नगरपंचायतने खड्डे बुजवण्याची मोहीमही अर्ध्यावरच टाकल्याने रस्त्याची पुरती दैनावस्था झाली आहे. त्यातच सोमवारी सत्‍ताधारी मंडळींनी स्वखर्चातून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.पं.स समोरील खड्डे सकाळी जांभा दगड व माती मिश्रीत ग्रीट टाकूण बुजवले जात होते.  मात्र, विरोधी शिवसेने या कामाला आक्षेप घेत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करीत काम रोखले. लागलीच सत्‍ताधारी नगरध्यक्षांसह नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेचे जि.प.सदस्य संजय पडते,सभापती राजन जाधव, न.पं.चे गटनेते बाळा वेंगुर्लेकर, नगरसेवक गणेश भोगटे यांच्यासह रिक्षा संघटनेचे अविनाश पाटील आदींनी आक्रमक पवित्रा घेत सत्‍ताधार्‍यांना जाब विचारला. सत्‍ताधारी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक सुनील बांदेकर विरूध्द संजय पडते, गणेश भोगटे, बाळा वेंगुर्लेकर असा सामना रंगला. सत्‍ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक हमरीतुमरी झाली. नगराध्यक्ष राणे, बांधकाम सभापती ओंकार तेली, राकेश कांदे आदींनी सामंजस्याची भूमिका घेत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी नगरसेवक स्वखर्चातून हे काम करीत असल्याचे नगराध्यक्षकांनी सांगून रोलर फिरवून काम करू, असे सांगितले.  यावेळी शिवसेनेचे गणेश भोगटे व  सुनील बांदेकर यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. नगराध्यक्ष श्री.राणेंसह सत्ताधारी नगरसेवकांनी गणेश चतुर्थीपूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील,असे सांगितले. यावेळी रिक्षा व्यवसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.