Tue, Mar 19, 2019 09:23होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध बाकी सगळे एकत्र

सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध बाकी सगळे एकत्र

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:09PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

विधान परिषदेच्या एका जागेसाठी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तीन केंद्रांवर 100 टक्के मतदान झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वत: मतदान काळात ठाण मांडून होते. सावंतवाडीत मतदान केंद्राच्या परिसरात भाजप, राष्ट्रवादी, स्वाभिमान आणि काँग्रेसचे नेते एकत्र होते. मात्र, शिवसेनेचे नेते एका बाजूला होते. त्यामुळे शिवसेना विरुद्ध बाकी सगळे अशी चर्चा सुरू होती. 24 मे रोजी या निवडणुकीची मतमोजणी रत्नागिरीत होणार असून निवडणूक निकालातही असेच चित्र बाहेर पडेल, अशी चर्चा सोमवारी जिल्ह्यात सुरू होती.

कुडाळ - 56, कणकवली - 77, सावंतवाडी - 79 या प्रमाणे मतदान झाले. यासाठी जिल्ह्यात 212 मतदार होते. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 212 मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला. सकाळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, कणकवलीच्या प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी मतदान प्रक्रियेची पहाणी केली. 

गेल्या दोन महिन्यांपासून सेना व राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेसाठीची रणधुमाळी सोमवारी मशिनबंद झाली. सेनेकडून राजीव साबळे, तर राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमान यांच्या महाआघाडीने माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी येथील प्रांत कार्यालयातील मतदान केंद्रावर तहसीलदार तथा प्रभारी निवडणूक अधिकारी सतीश कदम यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. या केंद्रावर 79 मतदार असून सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केले. सकाळी 12 पर्यंतच मतदानाची प्रक्रिया पार पडून 100 टक्के मतदान नोंदविण्यात आले.

माजी मुख्यमंत्री तसेच खासदार नारायण राणे, भाजप, काँग्रेस आणि शेकाप पाठिशी असल्याने आपला विजय निश्‍चित आहे, असा दावा महाआघाडीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी केला. भाजप नेते व पदाधिकार्‍यांची अनिकेत तटकरे व स्वाभिमान,काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी यावेळी जवळीक पहावयास मिळाल्याने भाजपने या निवडणुकीत पालघरचा वचपा काढण्यासाठी तटकरे यांना मदत केल्याची चर्चा सुरू होती.

शिवसेनेचे पदाधिकारी शांतपणे उभे होते
या विधान परिषद निवडणुकीत सेने विरुद्ध इतर पक्ष एकत्र आले आहेत.हे चित्र सोमवारी मतदानावेळीही दिसून आले.  येथील मतदान केंद्रावर भाजप, काँग्रेस, स्वाभिमान व राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी दिलखुलास चर्चा करीत असतानाच सेनेचे पदाधिकारी मात्र एका बाजूला शांतपणे उभे होते.निवडणूक निकालातही हेच चित्र दिसणार असल्याची चर्चा सुरू होती.