होमपेज › Konkan › शिवरायांचे बॅनर काढणे देवरुख न.पं.ला पडले महागात

शिवरायांचे बॅनर काढणे देवरुख न.पं.ला पडले महागात

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 10:54PMदेवरुख : प्रतिनिधी

शिवजयंती सोहळ्यानिमित्त देवरूख शहरात लावण्यात आलेले शिवरायांचे बॅनर शिवजयंतीच्या दुसर्‍याच दिवशी नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी काढून नेले ही बाब शिवप्रेमींना कळताच एकच खळबळ उडाली. हा प्रकार वाढण्याची चिन्हे दिसताच परत बॅनर लावले गेले. या गोष्टीचा जाब विचारायला गेलेल्या शिष्टमंडळासमोर कर्मचार्‍यांनी लेखी दिलगिरी व्यक्‍त केली आहे.या घटनेचा तालुका शिवसेनेतर्फे निषेध नोंदवण्यात आला.

देवरुख येथे माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली संगमेश्‍वर तालुका क्षत्रिय मराठा समाज व नागरिकांच्या वतीने शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी देवरुख परिसरात छ. शिवरायांचे फलक, बॅनर लावण्यात आले होते. ते बॅनर दुसर्‍याच दिवशी लगेच देवरुख नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी गाडीत भरुन नेले. या प्रकाराची कोणतीही कल्पना, सूचना आयोजकांना न देता हे बॅनर काढून नेण्यात आले. बॅनर काढल्याची घटना सोशल मीडियावरुन व्हायरल झाली आणि समस्त शिवप्रेमी एकत्र गोळा झाले. शिवरायांचे बॅनर काढणारे हे कर्मचारी कोण? त्यांना आदेश दिले कुणी? या प्रकाराची चर्चा झाली.हे प्रकरण वाढणार असे दिसताच नगरपंचायत कर्मचार्‍यांनी हे बॅनर तासाभरात परत लावले.

बुधवारी दि. 21 रोजी आयोजक या नात्याने रोहन बने, प्रमोद पवार, मनीष सावंत यांच्यासह दादा सीद, बंड्या बोरुकर, नीलम हेगशेट्ये, कल्पना केसरकर, अजित गवाणकर यांनी देवरुख नगरपंचायत येथे जाऊन नगराध्यक्ष निलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराचा जाब विचारला असता,  भुरवणे, शेट्ये यांनी याबाबत कर्मचार्‍यांनी हे काम केले आहे, असे सांगितले. 

बॅनर काढणारे कर्मचारी शशिकांत गांधी, लिंगाप्पा हळमणी व संतोष पवार यांनी शासन आदेश व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या जीआरनुसार अनधिकृत बॅनर काढल्याचे सांगितले. मात्र, या उत्तरावर शिवप्रेमींचे समाधान झाले नाही. मुळात छत्रपती शिवराय या थोर पुरुषाचे बॅनर तुम्ही काढताच कसे? असा सवाल उपस्थित केल्यावर नगरपंचायत कर्मचारी शशिकांत गांधी, लिंगाप्पा हळमणी, संतोष पवार यांनी शिवरायांचे बॅनर काढल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्‍त करतो, असे लेखी लिहून दिले.

शिवजयंती सोहळा सर्व नागरिकांनी एकत्र येऊन केला.शिवरायांच्या बॅनरवर कुणाचेही फोटो नव्हते, कोणत्याही पक्षाचा हा बॅनर नव्हता तरीही हे बॅनर काढून नेण्यात आले ही दुर्दैवी बाब आहे,  या घटनेचा शिवसेना संगमेश्‍वर तालुका वतीने आपण जाहीर निषेध नोंदवत आहोत, असे शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. 

या प्रकाराने देवरुख शहरात खळबळ उडाली असून नगरपंचायतीने सर्वांसाठी समान कायदा राबवावा, असे आवाहन शिवप्रेमींनी केले आहे. देवरुख नगरपंचायतीचे कर्मचारी शिवरायांचे बॅनर गाडीत भरत असताना सामान्य नागरिकांना आश्‍चर्य वाटत होते. महाराजांचे बॅनर नको, त्या गाडीतून नेताना एक दोघांनी असे करु नका, असे सांगितले. चहाचा व्यवसाय करणार्‍या महिलेनेही याबाबत या कर्मचार्‍यांना असे करु नका, असे सांगितले होते. तरी या तीन कर्मचार्‍यांनी हे बॅनर काढलेच, अशी चर्चा सुरु होती. 

महापुरुषांचे बॅनर लावायला परवानगी कसली हवी, असाही मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. शिवजयंती सोहळा उत्साहात झाला. मात्र, या प्रकाराने गालबोट लागले व गांधी, हळमणी,पवार यांना लेखी दिलगिरी व्यक्‍त करण्याची नामुष्की सहन करावी लागली.