Tue, Mar 19, 2019 15:46होमपेज › Konkan › शिमगोत्सवात रंगले मानपानाचे वाद

शिमगोत्सवात रंगले मानपानाचे वाद

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 9:06PMचिपळूण : वार्ताहर

शिमगोत्सव आणि वाद हे गेली अनेक वर्षे समीकरण झाले आहे. तालुक्यातील दसपटी विभागातील नांदिवसे येथील शिमगोत्सव वाद वर्षानुवर्षे सुरू आहे. हे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न होतात. मात्र, संचारबंदी आदेश लागू करून शिमगोत्सव होत नाहीत. यावर्षी या वादात कोळकेवाडी येथील देवस्थानच्या वादाची भर पडली आहे.

दरवर्षी शिमगोत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील मार्गताम्हाने, मांडकी, नांदिवसे येथे शिमगोत्सव काळात वाद होतात. गतवर्षी टेरव येथे वाद झाला. शिमगोत्सव आल्यानंतर येथील तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पोलिस यंत्रणा वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करतात. दोन्ही गटांकडून चर्चेच्या अनेक फेर्‍या होतात. मात्र, वाद मिटत नाहीत.

तालुक्यातील मार्गताम्हाने येथे गेली अनेक वर्षे देवस्थान आणि गुरव यांच्यामध्ये जमिनीचा वाद आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात शिमगोत्सव होतो. परंतु, हा वाद यावर्षी मिटण्याची चिन्हे आहेत. त्या द‍ृष्टीने तहसीलदार जीवन देसाई, प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले यांनी ग्रामस्थांबरोबर बैठका घेतल्या. त्यामुळे यावर्षी येथे पोलिस बंदोबस्ताशिवाय शिमगोत्सव होईल, अशी अपेक्षा आहे.

कोळकेवाडी येथील ग्रामदैवत वाघजाई-केदार देवस्थान ट्रस्टवरून वाद निर्माण झाला आहे. देवस्थान कमिटीमध्ये कोणाला किती स्थान द्यावे, हा मुद्दा महत्त्वाचा असून या वादावर पडदा पाडण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात आला. परंतु, हा वाद कायम आहे. त्याच पद्धतीने गेली अनेक वर्षे शिमगोत्सवाच्या निमित्ताने नांदिवसे येथील वाद कायम आहे. शिंदे आणि अन्य ग्रामस्थांमध्ये हा वाद असून या संदर्भात अनेकवेळा चर्चेच्या फेर्‍या झाल्या. 

सध्या हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. तरीही शिमगोत्सवात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस व महसूल प्रशासनाने दोन्ही गटांच्या बैठका घेतल्या. यामध्ये या चर्चा निष्फळ ठरल्या. त्यामुळे नांदिवसेमध्ये शिमगोत्सवात जमावबंदी आदेश लागू होण्याची शक्यता आहे. अखेरपर्यंत शिमगोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी वादावर तोडगा काढण्यास तहसीलदार देसाई प्रयत्न करीत आहेत.