Mon, Jun 24, 2019 21:02होमपेज › Konkan › कळकीचे बेटी एक... 

कळकीचे बेटी एक... 

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 8:49PMचिपळूण : समीर जाधव 

कळकीच्या बेटी एक कोम जन्मला ।
वाकडा तिकडा गगनाशी गेला ॥ 
कोई हा कोम गेला लोहारवाडा ।
लोहार दादांनी लोहबंध केला ॥

अशा प्रकारे होलिकोत्सवात म्हणण्यात येणारे हे लोकगीत कोकणच्या लोकसंस्कृतीचे हुबेहूब दर्शन घडवते. कोकणचा शिमगा होळीने सुरुवात होतो. पहिल्या होळीपासून हे लोकगीत परंपरेने म्हटले जाते. आता मात्र जुन्या जाणत्या लोकांनाच हे गीत माहीत आहे. नवीन पिढीला या लोकगीताचे शब्दच माहीत नाहीत. या लोकगीतातून कोकणाची लोकसंस्कृती प्रदर्शित होते. लोकगीतात ऐतिहासिक काळातील अर्थात शिवकालातील बाराबलुतेदारी आणि त्यांचे वर्णन येते. लोहार, सुतार, सोनार, कुंभार, कासार, शिंपी अशा अठरापगड जाती या गाण्यातून एका मागून एक येत जातात आणि सारा गाव या गाण्याच्या तालावर होळी भोवती फेर धरतो. हातात अक्षता.. ढोल ताशांचा ताल आणि मुखाने ‘कळकीच्या बेटी एक कोम जन्मला...’ अशा मंगलमय वातावरणात फेर धरून हे लोकगीत आमच्या अनेक पिढ्यांपूर्वीपासून म्हटले जाते.पण इतकी वर्षे म्हटले जाणारे हे लोकगीत कुठेच लिखित स्वरूपात आढळत नाही. केवळ परंपरेने वर्षानुवर्षे ही लोकसंस्कृती कायम टिकून आहे. हेच तर कोकणचे वैशिष्ट्य आहे.  

हे लोकगीत म्हणत होळीभोवती आठ-दहा फेरे झाल्यावर मानकरी होळी प्रज्ज्वलित करतात. या गीतानंतर मारण्यात येणार्‍या फाका (शिमग्यातील बोंब) या देखील अस्सल कोकणी लोकसंस्कृतीचे दर्शन घडवितात.

साया रे साया आमच्या ग्रामदेवतेचा सोन्याचा पाया रे..., डोंगराची वरी रे वरी..आमच्या देवाला सोन्याची सरी रे... अशा अनेक बोंबा मारल्या जातात त्यात गावातील टवाळ पोरं काही मजेशीर बोंबा देखील मारतात. यामुळे या होलिकोत्सवात रंग भरतो.

कोकणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे आमचा घराघरांत साजरा होणारा गणेशोत्सव आणि शिमगोत्सव! कारण या दोन उत्सवांत साम्य म्हणजे या दोन्ही उत्सवात आमच्या घरी ‘देव’ येतो. आपल्या घरात देव येणार म्हणून बाकी कशाला नाही आले तरी या दोन सणाला हमखास चाकरमानी गावी येणारच..! गणेशोत्सवात घराघरांत श्री गणेशाची स्थापना होते. तर शिमगोत्सवात ग्रामदैवत घराघरांत येते. ग्रामदैवत घराघरांत येण्याची कोकणातील ही परंपरा बहुतेक जगभरात आमच्याकडेच असेल. त्यामुळे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

कोकणच्या होळीची सुरुवातच सामाजिक सलोखा सांगणार्‍या लोकगीतातून होते. त्यामुळे या होळीत अनिष्ठ प्रथा, चुकीच्या पद्धती जाळल्या जातात. सामाजिक समरसतेचे ‘बीज’ या लोकगीतात ठासून भरलेले आहे. पण आताच्या काळात फक्‍त हे लोकगीत होळी भोवती म्हणण्याचे परंपरागत गीत राहिले आहे. कारण या गीताचा अर्थ कोणीही समजून घ्यायला तयार नाही. या सणाच्या दिवसात जुन्या लोकांच्या सुरात सूर मिसळून हे गाणे गुणगुणायचे आणि पुन्हा वर्षभर विसरायचे अशीच परंपरा चालत आलेली आहे. पण या एका गीतावर आपली कोकणी ग्रामसंस्कृती उभी आहे. गाण्याची सरकत जाणारी रचना पाहिल्यास याचा प्रत्यय येतो. आपल्या ग्रामदेवतेसाठी गावातील प्रत्येक समाज आपापल्या परीने काय काय योगदान देतो याचा साक्षात्कार या लोकगीतातून होतो.

या आधारावरच गावोगावीचे ग्रामदैवत आजही भक्‍कमपणे उभे आहे. गावातील ‘चौखांब’ हे ग्रामदेवतेचे महत्त्व टिकवून ठेवण्यातील महत्त्वाचे घटक आहेत. कोकणचा गावगाडा यावरच अवलंबून आहे.आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात काही प्रमाणात या गावगाड्याला फाटा देण्यात येतो, मात्र तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात परंपरागत गावगाडा चालवला जातो, हे विशेष आहे.

ग्रामदेवतेची पालखी गावातील सगळ्या घरी जाते. मानपानाचे वादविवाद सोडल्यास प्रत्येकाच्या घरी पालखी येणे हा परंपरागत हक्‍क असतो. मग त्यामागे जात पात पाहिली जात नाही. सामाजिक समरसता जपणारा असा हा आमचा अस्सल कोकणी शिमगा आहे. हिंदूंसह मुस्लिम आणि सर्व समाज घटक पालखीची ओटी भरणारच... हा कोकणाच्या शिमग्याचा रिवाज आहे. ग्रामदैवत म्हणजे त्या त्या गावचा राजाच...! असा मान या देवतेला दिला जातो. त्यामुळे रयत या शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालखीचे भोई होतात, काही ढोलकरी होतात, काही मानकरी होतात, काही गुरव तर काही भक्‍त होतात. सर्व एकत्र मिळून हा उत्सव साजरा करतात. 

होळीची सुरुवातच मुळी ज्या गाण्यातून होते ते लोकगीत सामाजिक समरसतेचा संदेश देते. बारा बलुतेदारांचा हा शिमगोत्सव आहे, याचा हा पुरावाच हे लोकगीत देते. आज मात्र याच शिमगोत्सवावरून वाद होतात. या वादात ग्रामदेवतेला अडकवले जाते. वाद ग्रामस्थांचा आणि ‘देवाचा’ शिमगा रोखला जातो. त्यामुळे गाव कारभार्‍यांनी याचा विचार करून परंपरा चालवण्यासाठी अशा वादविद्वानांना होळीत आहुती देऊन गावगाडा अधिक सक्षम करायला हवा. सामाजिक समरसतेच्या कळकीच्या बेटीतील ‘कोंबाला’ खतपाणी घालायला हवे. तेव्हाच आपली कोकणी लोकसंस्कृती चिरकाल टिकून राहील.