Thu, May 23, 2019 14:55
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › प्रत्येक कुटुंबाचा विकास हाच ध्यास : शेखर निकम 

प्रत्येक कुटुंबाचा विकास हाच ध्यास : शेखर निकम 

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 06 2018 10:25PMचिपळूण : खास प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकीतून प्रत्येक कुटुंबाचा विकास होणे गरजेचे आहे. गत दहा वर्षांत चिपळूण तालुक्याचा विकास खुंटला आहे. मागील पराभव विसरुन पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला लागलो आहे. आगामी निवडणुकीसाठी माझ्या पाठीशी राहा. तुम्ही दिलेल्या संधीचे मी सोने करुन दाखवितो, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी उपस्थितांना केले.

तालुक्यातील फुरुस येथील कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डेरवण, कोसबी, नांदगाव, कुटरे, तळवडे, कुटरे होडेवाडी, येगाव यागावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी पं. स. सभापती संतोष चव्हाण, संजय कदम यांच्या पुढाकाराने फुरुस येथे हा मेळावा घेण्यात आला. 

यावेळी निकम पुढे म्हणाले, या मेळाव्याच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ऊर्जा मिळाली आहे.  काहीही हातात नसतानादेखील मी मागील निवडणूक लढवली ती केवळ कार्यकर्त्यांच्या जोरावर. चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. चिपळूणमध्ये आपणाला मोठी साथ आहे. संगमेश्‍वरमधूनही मोठी ताकद आहे. त्यामुहे येणारी निवडणूक ही शेखर निकमांची नसून तुम्हा सर्वांची आहे. माझ्या रुपाने इथे बसलेला प्रत्येक माणूस आमदार म्हणूनच मतदारसंघात दिमाखात वावरणार आहे. तुम्ही सर्वजण एक वर्ष माझ्यासाठी द्या. पुढील सर्व वर्षे मी आपल्यासाठी देईन.

विकासकामाबरोबर प्रत्येकाला रोजगार, नोकरी, व्यवसाय देणे हा अग्रक्रम राहणार आहे. फुरुस गावात दोन पाझर तलाव मंजूर करुन घेतले. कोसबीमध्येदेखील पाझर तलाव मंजूर केला. मात्र, दुर्देवाने मुंढे येथेदेखील पाझर तलाव मंजूर झाला असताना सध्याच्या शासनाने पाझर तलाव देण्याला ‘खो’ दिला. दहा वर्षांत न झालेली कामे पूर्णत्वास न्यायची आहेत. पक्षात जुन्याचा मान आणि नव्यांचा सन्मान करणारा मी कार्यकर्ता आहे. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी सकारात्मक मांडणी निकम यांनी केली.
यावेळी जि. प. सदस्या पूनम चव्हाण, नितीन ठसाळे, प्रकाश कानसे, समिक्षा घडशी, विजयकुमार जाधव, राजेंद्र मोलक, आंग्रे गुरुजी तसेच सरपंच, कार्यकर्ते उपस्थित होते.