Sun, May 26, 2019 15:14होमपेज › Konkan › ‘तिची’ दररोज 50 कि.मी. पायपीट!

‘तिची’ दररोज 50 कि.मी. पायपीट!

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 11:15PMकणकवली : नितीन सावंत

दररोज सकाळी घरातून बाहेर पडायचे, सुमारे 25 कि.मी.चा रस्ता तुडवत थेट कणकवली गाठायची, पुन्हा सायंकाळी परतीचा प्रवास सुरू करत रात्री 25 कि.मी. वरील घरापर्यंत पोहचायचे तेही दररोज. उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, दिवसा रात्री तीची पायपीट सुरूच असते. स्वतःशीच बोलत रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या कचर्‍यातील एखादी वस्तू घेत, कुणी काही दिले तरच खायचे असा तिचा दिनक्रम सुरू असतो. 

वेडी ती, खुळी ती असे शब्द तिला पाहल्यानंतर अनाहुतपणे बाहेर पडतात.  ती मनोरूग्ण असली तरी तिची नेहमीची ही पायपीट पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्‍न निर्माण होतात. कोण असेल ही? तिची ही अवस्था कशी झाली? ही दररोज कुठुन येते? याच उत्सुकतेतून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून तिची कर्मकहानी पुढे आली. कणकवली तालुक्यातील दिगवळे-गावठणवाडी येथील आई-वडील, पाच बहिणी, भाऊ अशा शेतकरी कुटुंबातील सरीता शांताराम परब. तिचे इयत्ता सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेत झाले. 

त्यानंतर नोकरीसाठी ती मुंबईत गेली. एका खाजगी कंपनीत ती नोकरीला होती. नोकरी करतानाच ती गावातील कुटुंबीयांनाही आर्थिक हातभार लावत होती. सारे काही सुरळीत सुरू होते. मात्र तिच्या नशिबी काही वेगळेच होते. काही कारणास्तव ती खाजगी कंपनी बंद झाली. त्यामुळे बेरोजगार झालेली सरीता पुन्हा गावी दिगवळे येथे घरी  आली. दरम्यान मुंबईत राहत असताना तीला अध्यात्माची ओढ लागली होती. उपवास, पूजा-अर्चा यामध्ये तिला विशेष आवड  होती. गावी आल्यानंतरही तिचे उपवास, पूजापाठ सुरू असायचे. तिला उपवास, पूजा पाठ यामध्ये कुणीही हस्तक्षेप केलेला चालायचा नाही. पूजेच्या साहित्याला चुकून कुणाचा स्पर्श झाला तर ती त्रागा करायची.एवढा पराकोटीची साधनशुचिता तीची होती.

या पराकोटीच्या अध्यात्मातूनच हळहळू तिचा हा त्रागा वाढत गेला आणि तिचे मानसिक संतूलनही ढासळत गेले. त्यातूनच तिची वाटचाल  मनोरूग्णाच्या दिशेने झाली. तिचे सध्याचे वय 45 च्या आसपास आहे.

गेली दहा ते बारा वर्षे ती मनोरूग्ण अवस्थेत आहे.  दररोज सकाळी ती 8 ते 9 वा. दिगवळे येथील घराजवळून बाहेर पडते. रस्त्याच्या एका बाजूने चालत ती दुपारपर्यंत कणकवलीत पोहचते. सायंकाळी पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतो आणि रात्री 10 ते 11 वा. पर्यंत ती दिगवळेत घरी पोहचते. या प्रवासा दरम्यान ती रस्त्याच्या बाजूला कचर्‍यातील  बांगड्या वेचून त्या हातात घालायच्या, प्लास्टिक कागद, बाटल्या किंवा अन्य साहित्य पिशवीत भरायच्या आणि सोबत घेऊन जायच्या. केव्हातरी  गावातील मंदिरात जायचे, कुणी थांबविण्याचा प्रयत्न केला तर हातानेच झिडकारायचे,  पायात केव्हातरी तुटलेले चप्पल असते अन्यथा रणरणत्या उन्हात डांबरी रस्त्यावरून चालायचे. पावसाळ्यात भिजतच चालायचे, ना थंडीची तमा, ना अंधाराची भीती. दमायला, थकायला झाले तर रस्त्याच्या बाजूला बसायचे असा तिचा दिनक्रम सुरु असतो. दिगवळे ते कणकवलीपर्यंतचा तिचा हा प्रवास गेली काही वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.