Fri, Jan 24, 2020 22:52होमपेज › Konkan › तिवरे धरण दुर्घटना; तिघे बेपत्ताच, शोधकार्य सुरूच

तिवरे दुर्घटना; तिघे बेपत्ताच, शोधकार्य सुरूच

Published On: Jul 09 2019 10:52AM | Last Updated: Jul 09 2019 10:52AM
चिपळूण : पुढारी ऑनलाईन

तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेनंतर सलग सातव्या दिवशी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांकडून अद्याप काही बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत बळी पडलेल्या २० जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अद्याप तिघे बेपत्ता आहेत. 

याआधी येथील वाशिष्ठी खेडमधील जगबुडी नदीने सायंकाळी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तिवरे येथील धरणफुटीत बेपत्ता असणार्‍या लोकांचा शोध घेण्यात एनडीआरएफच्या जवानांना अडचण निर्माण झाली होती. 

तिवरे येथील धरण फुटल्‍याने यात २३ लोक वाहून गेले होते. या घटनेनंतर आज, सलग सातव्या दिवशीही शोधमोहिम सुरू आहे. या ठिकाणी बेपत्ता झालेल्यांचा एनडीआरएफ जवानांकडून परिसरातील नदीपात्रामध्ये उतरून शोध सुरू आहे.  

पहिल्या टप्प्यात स्थानिक पोलिस, आदिवासी, कातकरी समाजातील धाडसी तरुण व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने काही जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले. आता उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी हे जवान तिवरे, आकले, दादर येथील नद्यांमधून २० ते २५ किलोमीटरपर्यंत शोधमोहिम राबवित आहेत. 

तिवरे हे तालुक्यातील दसपटी विभागात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले छोटेसे गाव आहे. येथे २० वर्षांपूर्वी धरण बांधण्यात आले. हे धरण फुटल्याने धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या भेंदवाडीमध्ये असलेल्या १३ घरांपैकी ९ घरे वाहून गेली आहेत. या घरांसोबतच गोठे, गुरे-ढोरेही वाहून गेली आहेत.