Thu, Jun 27, 2019 10:30होमपेज › Konkan › मालवणात समुद्राच्या पाणी पातळीत वाढ

मालवणात समुद्राच्या पाणी पातळीत वाढ

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 10:57PM

बुकमार्क करा


मालवण : प्रतिनिधी 

केरळ व तामिळनाडूला तडाखा देणार्‍या ओखी चक्रीवादळाचा  जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मोठा प्रभाव दिसून येत आहे. शनिवारी रात्रीपासून समुद्राला उधाण आले असून मालवण किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन किनार्‍यावर जोरदार लाटा धडकत होत्या. तर रविवारी सकाळपासून वार्‍यानेही जोर धरला. याचा थेट परिणाम मालवणच्या पर्यटन व्यवसायावर होऊन उधाणलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक तसेच स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा प्रकार बंद ठेवले होते. समुद्रात 6 डिसेंबरपर्यंत दोन नंबरचा बावटा कायम करण्यात आला आहे. दरम्यान,  येत्या 48 तासांत समुद्रात सोसाट्याचे वारे वाहणार आहेत. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्गचे अध्यक्ष उदय चौधरी यांनी केले आहे.

केरळ तामिळनाडूला चक्रीवादळाचा तडाखा बसल्याचे समजल्यानंतर व समुद्रात वादळसद‍ृश परिस्थिती जाणवू लागताच सिंधुदुर्गसह केरळ तामिळनाडूच्या बोटींनी देवगड बंदराचा आसरा घेतला होता.  शनिवारी मालवण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असतानाच रात्रीपासून समुद्राला उधाण आले. यामुळे समुद्राच्या मोठ्या लाटा किनार्‍यावर धडकत होत्या.