Sat, Jul 20, 2019 14:59होमपेज › Konkan › किनारपट्टीला उधाणाचा धोका

किनारपट्टीला उधाणाचा धोका

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 11:35PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पूर्वमोसमी पावसाने झोडपल्यानंतर आणि मान्सून कोकणच्या  वेशीवर आल्याची अचूकता दिल्यानंतर आगामी दोन दिवस कोकण किनारपट्टीला उधाणाचा धोका संभवणार आहे. किनारपट्टी भागात तीन ते सहा मीटर उंचीच्या लाटा उसळणार असून, किनारी गावांसह मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पूर्वमोसमीने मंगळवारीही आपली वाटचाल मोसमी पावसाच्या दिशेने  केली आहे. 

रविवारपासून पूर्वमोसमीचा रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात ठिय्या आहे. वादळी वार्‍यासह आलेल्या या पावसाने आतापर्यंत जिल्ह्यात 12 लाखांची हानी केली आहे. मंगळवारीही पावसाने सायंकाळी जोर धरला होता. दिवसभर मळभाचे आच्छादन ठेवून सायंकाळी सरींचा राबता सुरू ठेवला. त्यामुळे अनेक भागात पडझडीच्या दुर्घटना घडल्या.

चिपळूण तालुक्यात सुकीवली येथे एका घराच्या पडझडीत दहा हजारांचे नुकसान नोंदविले. उंबरोली येथे एका घरावर वीज पडल्याने हानी झाली. संगमेश्‍वर तालुक्यात झाड पडल्याने हॉटेलचे नुकसान झाले. देेवळे येथील विनायक बागवे यांच्या घरावर वीज कोसळल्याने घराचे अंशतः नुकसान झाले, तर वीज पडल्याने  रविवारी  जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील यांत्रिक उपकरणे निकामी झाली होती. तसेच कारागृह अधीक्षक कार्यालयालाही विजेचा लोळ कोसळल्याने उपकरणांची हानी झाली. 

जिल्ह्यात मंगळवारी एकूण 258 मि.मी. पाऊस झाला. सरासरी पावसाची नोंद 2876 मि.मी. एवढी नोंदविली.  यामध्ये सर्वाधिक पाऊस संगमेश्‍वर तालुक्यात पडला. मंडणगड तालुक्यात  30 , दापोलीमध्ये 15, खेडमध्ये 14, गुहागर तालुक्यात 17.00, चिपळूणमध्ये केवळ 2, संगमेश्‍वर तालुक्यात 74, रत्नागिरीत  49 लांजा आणि राजापूर तालुक्यात अनुक्रमे 25 आणि 32 मि.मी. पावसाची नोंद झाली.

पूर्व मोसमी पावसाने जिल्ह्याला तडाखा दिला असताना मान्सून  कोकणच्या सीमांवर रेंगाळत असल्याची सूचकता वेधशाळेने वर्तविली आहे. आगामी दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात उधाणाचा धोका संभवणार आहे. किनार्‍यांवर सुमारे तीन ते सहा मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविताना  किनारी भागात सावधगिरीचा इशारा प्रशासनाने दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या  किनारी भागात  वादळी पावसामुळे बुधवारी आणि गुरूवारी सागरी भागाला उधाणाचा धोक्याने प्रशासन सतर्क करण्यात आले आहे.  बंदर विभागाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.