Thu, Mar 21, 2019 11:22होमपेज › Konkan › पाट-वरचावाडा शाळेचे छप्पर कोसळले

पाट-वरचावाडा शाळेचे छप्पर कोसळले

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 10:01PMकुडाळ : शहर वार्ताहर

जिल्हा परिषद केंद्रशाळा पाट-वरचावाडा या प्रशालेच्या वर्गखोलीचे धोकादायक छप्पर कोसळून लाकडी रिपा व कौले शाळेच्या व्हराड्यांसह कार्यालयात कोसळली. मंगळवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने सुदैवाने  मुलांचा जीव वाचला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. पाट-वरचावाडा ही इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची प्रशाला आहे. या शाळेत सुमारे  शंभर विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत.  शाळेच्या जुन्या इमारतीमधील वर्गखोल्यांची छप्पर नादुरूस्त झाल्यामुळे मुलांना दुसर्‍या वर्गात बसविण्यात येत होते. 

तर धोकादायक खोलीत मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफरूम तयार करण्यात आला होता. मंगळवारी रात्री या खोलीचे  छप्पर अचानक कोसळले. बुधवारी सकाळी शाळेत आलेल्या मुलांच्यशा निदर्शनास हा प्रकार आला. मुलांनी याची माहिती पालकांना देताच पं.स. सदस्य सुबोध माधव, सरपंच सौ. रिती राऊळ, उपसरपंच गिरीप्रसाद राऊळ, तलाठी एस.एच.जाधव, ग्रामविकास अधिकारी एस.बी. कोकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरूनाथ राऊळ आदी घटनास्थळी हजर झाले.  नुकसानीची पंचयादी करण्यात आली. डॉ. माधव यांनी कुडाळ सभापती राजन जाधव यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली. या शाळेच्या छप्पर दुरूस्तीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सहा वेळा सादर केला, मात्र संबंधित यंत्रणेने याची दखल घेतली नाही. त्यामुळेच आजची घटना घडली. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला असल्याची संतापजनक प्रतिक्रिया डॉ. माधव यांनी व्यक्‍त केली.