Thu, Jun 27, 2019 10:32होमपेज › Konkan › निपाणी रेंजमधील ३०० शाळांचा कारभार अधांतरीच

निपाणी रेंजमधील ३०० शाळांचा कारभार अधांतरीच

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 10:10PM

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील 

निपाणी गटशिक्षणाधिकारी (बीईओ) कार्यालयात गटशिक्षणाधिकारी, व्यवस्थापक व बी.आर.सी. प्रमुख ही महत्त्वाची  तीन पदे गेल्या पाच महिन्यांपासून रिक्‍त आहेत. त्यामुळे निपाणी  रेंजअंतर्गत येणार्‍या प्राथमिक व माध्यमिक विभागातील जवळपास 300 शाळांचा कारभार अधांतरीच सुरू आहे.

गेल्या 20 वर्षापासून शाहूनगर येथे हे कार्यालय अस्तित्वात आहे.  निपाणी तालुका निर्मितीची घोषणा होण्यापूर्वीच परिसरातील शाळांची संख्या लक्षात घेता निपाणीला शैक्षणिक तालुक्याचा दर्जा दिला गेला आहे. या कार्यालयांतर्गत निपाणी परिसरातील अनुदानित, विनाअनुदानित अशा सुमारे 300 प्राथमिक व माध्यमिक शाळांचे कामकाज जोडले आहे.

आवश्यक ती साधने व उपकरणांची उपलब्धता या कार्यालयाला सरकारने करून दिली आहे. कार्यालय आवारात बीआरसी, मराठी व उर्दू शाळांचे कामकाज सुरू आहे. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी एम. एन. दंडीन यांची बेळगाव येथे बदली झाल्याने त्यांचा कार्यभार आजतागायत प्रभारी म्हणून शिक्षण संयोजक व्ही. के. सनमुरी यांच्याकडे आहे. या विभागाचा विस्तार मोठा असल्याने या कार्यालयात कायमस्वरूपी प्रमुख अधिकार्‍यांची गरज आहे. 

कार्यालयाचे व्यवस्थापक कोलार यांचा काही दिवसांपूर्वी बेळगाव येथे अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे हे पदही रिक्‍त आहे. शिवाय बीआरसी प्रमुख बी. एस. तंगडी यांची डाएट येथे बदली झाली. त्यामुळे व्यवस्थापक पदावर शेख तर बीआरसी म्हणून मकानदार अशा तीन अधिकार्‍यांवर वरील पदांची प्रभारी म्हणून जबाबदारी आली आहे.

प्रभारी अधिकारी असले तरी महत्त्वाचे निर्णय घेताना व काही शासकीय कामे करताना त्यांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे वरील सर्व शाळा व एकूणच कार्यालयअंतर्गत प्रशासकीय कामकाजावर गंभीर परिणाम जाणवत आहे. या तिन्ही पदावरील अधिकार्‍यांकडे शिक्षकांचे प्रशिक्षण व शासकीय उपक्रमाची व आदेशाची अंमलबजावणी अशा प्रकारे कामकाजाचे स्वरूप आहे. प्रभारी अधिकार्‍यांना या कामाव्यतिरिक्‍त अन्य कामाचीही जोखीम सांभाळावी लागत आहे.

गटशिक्षणाधिकारी दंडीन यांनी पाच वर्षे चांगल्या प्रकारे आपल्या पदाची जबाबदारी सांभाळली. याकाळात काही दिवस त्यांना निपाणीसह हुक्केरी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली होती. दंडीन यांनी सरकारकडे पाठपुरावा करून कार्यालयाला लागणारी साधनसाम्रगी शिवाय स्वतंत्र वाहन मिळविले. मात्र आता मुख्याधिकार्‍यांसह इतर पदांची  वानवा आहे. त्यामुळे रिक्‍त जागांवर लवकरात लवकर जबाबदार अधिकार्‍यांची नियुक्‍ती व्हावी, अशी मागणी होत आहे.

लोकायुक्त विभागाची प्रथमच भेट

गेल्या महिन्यात पहिल्यांदाच प्रभारी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बंगळूर येथील लोकायुक्‍त विभागाने तर नूतन शिक्षण आयुक्‍त तुरमुरी, डीडीपीआय राजीव यांनी या विभागाला भेट देऊन अनेक शाळांची पाहणी केली. लोकायुक्‍त विभागाने आश्रयनगर, शिंदे नगर, फॅक्टरी साईट येथील शाळांचे कामकाज, सुविधा, परिसराची स्वच्छता या बाबींची प्रामुख्याने पाहणी केली.