Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Konkan › वर्षा पर्यटकांच्या स्वागतासाठी सावडाव धबधबा सज्ज!

वर्षा पर्यटकांच्या स्वागतासाठी सावडाव धबधबा सज्ज!

Published On: Jun 15 2018 11:49PM | Last Updated: Jun 15 2018 10:46PMनांदगाव  : सचिन राणे

मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर असलेला निसर्गरम्य सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. आता वर्षा पर्यटकांच्या गर्दीने हा धबधबा गजबजून जाणार आहे. हा धबधबा पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन स्थळ यादीत असला तरी तेथे अजून पर्यटकांसाठी मूलभूत सुविधांची वानवा आहे. मात्र सावडाव ग्रा.पं. ने आपल्या स्तरावर पर्यटकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मान्सून सुरू झाल्यावर जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहीत होतात. सहाजिकच राज्यभरातील वर्षा पर्यटकांची पाऊले सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळू लागतात. कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबाही वर्षा पर्यटकांच्या पंसतीस उतरलेला धबधबा आहे.  कणकवलीहून 12 कि.मी.,सावडाव फाट्यापासून 6 कि.मी.तर ओटव फाट्याहून 9 कि.मी अंतरावर हा धबधबा आहे.  सुमारे 70 फूट  उंच डोंगर पठारावरुन वाहणारा पाण्याचा प्रवाह अचानक पसरट कड्यावरुन खाली कोसळतो. गर्द हिरव्या झाडीझुडपातून कोसळणारा हा धबधबा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. प्रवाहाच्या बाजूला एक गुहा आहे. प्रवाह कोसळतो तेथे तलावासारखा  नैसर्गिक विस्तीर्ण डोह तयार झाला आहे. धबधब्याखाली आंघोळीचा आनंद लुटण्यासाठी  हा धबधबा सर्वात सुरक्षित असल्याने प्राधान्याने कुटुंबवत्सल पर्यटकांचा ओढा या धबधब्याकडे असतो.  जून ते सप्टेंबर या काळात सावडाव धबधबा वर्षा पर्यटकांच्या गर्दीने फूलून जातो. 
 सावडाव धबधबा परिसरात स्ट्रीट लाईटसाठी 10 लाखाचा निधी मंजूर झाला असून काम प्रगतीपथावर आहे तर धबधब्याकडे जाणारा रस्ता व  स्वागत कमानी  मुख्यामंत्री सडक योजनेतून मंजूर झाला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम प्रलंबित आहे. यामुळे यावर्षीही सावडाव धबधब्याकडे जाताना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरुन  धबधबा परिसरात रंगरंगोटी, नळपाणी योजना, स्वच्छतागृह अशी कामे केली जाणार आहेत. 

बारमाही पर्यटनासाठी वॉटर पार्क
 सावडाव धबधबा हा फक्‍त पावसाळी पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. हे ठिकाणी बारमाही पर्यटन केंद्र म्हणून  उदयास यायचे असल्यास तेथे वॉटरपार्क उभारण्याची गरज आहे. यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल तसेच  शासनाच्या महसुलातही  भर पडेल. यासाठी लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

 पोलिस संरक्षणाची गरज 

 धबधब्यावर आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये रॅम्प, पायर्‍या, सुशोभिकरण, बाथरूम, टॉयलेट  आदी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे या सुविधा अपुर्‍या पडत आहेत. तसेच रस्ताही अरूंद असल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच दमछाक होते.  धबधब्यावरील हुल्लडबाजीचे प्रकार रोखण्यासाठी वर्षा पर्यटन संपेपर्यंत परिसरात पोलिस नियुक्‍त करण्याची गरज आहे.