Mon, Jun 17, 2019 18:38होमपेज › Konkan › सावंतवाडी : टर्मिनसचे रखडलेले काम सुरु करा : रुपेश राऊळ

सावंतवाडी : टर्मिनसचे रखडलेले काम सुरु करा : रुपेश राऊळ

Published On: Jan 02 2018 6:05PM | Last Updated: Jan 02 2018 6:05PM

बुकमार्क करा
सावंतवाडी : प्रतिनिधी 

मोठा गाजावाजा करुन कोकण रेल्वेच्या सावंतवाडी स्टेशनवर उभारण्यात येणाऱ्या रेल्वे टर्मिनसच्या दुसऱ्या फेजचे काम रखडले आहे. या प्रकाराबद्दल आज शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशनमास्तर संतोष महाजन यांना रखडलेले काम त्वरति सुरु करावे म्हणून निवेदन देण्यात आले. 

दिलेल्या निविदेनुसार टर्मिनसचे काम सुरु न केल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा राऊळ यांनी दिला आहे. केंद्रीय वाणिज्य तथा उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले असुन त्यांनी रेल्वे बजेटमध्ये तरतुद न करता टर्मिनसचे काम सुरु करुन जनतेच्या डोळ्यात धुळ फेक करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

या जिल्ह्याचे सुपुत्र माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसचे पहिल्या व दुसऱ्या फेजचे असे दोनदा भुमिपुजन केले. या भुमिपूजनातील पहिल्या फेजचे काम पुर्ण झाले दुसऱ्या फेजमधील तिकीट घर व वेटिंग रुमच्या इमारत कामास सुरुवात केलेली असताना या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन ठेकेदाराने काम सुरु केलेही परंतू रेल्वेने निधी नसल्याचे कारण दाखवुन इमारतीसाठी उभारण्यात येणारे पिलरचे खड्डे बुझवुन इमारत बांधकाम न करण्याचा परस्पर निर्णय घेतल्याने शिवसेना आक्रमक झाली व त्यांनी रेल्वेस्टेशनला धाव घेतली.

स्टेशनमास्तर महाजन यांना जाब विचारला असता त्यांनी फंड नसल्यामुळे काम थांबल्याचे सांगितले. याप्रकरणी खासदार विनायक राऊत व गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे हा विषय नेऊन ते शासनस्तरावर टर्मिनसचे काम शीघ्र गतीने सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील असे परब यांनी यावेळी सांगितले. इमारतीचे रखडलेले काम तात्काळ सुरु करा अन्यथा सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश परब तसेच जि प सदस्य मायकल डिसोझा, पं स सदस्य मेघ:शाम काजरेकर, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, युवा सेना शहराधिकारी समिर मामलेकर, एस टी सेना तालुकाधिकारी चंद्रकांत कासार, मंगलदास देसाई, दिलीप सोनुर्लेकर, सुनील देसाई, भाऊ देवळी, चंद्रकांत नेवगी, बाबू गावडे, सहदेव राऊळ, दाजी सावंत, विभागप्रमुख विनोद काजरेकर, विनोद ठाकूर, महेश शिरोडकर, योगेश नाईक, सुभाष मयेकर, दत्ताराम पेडणेकर, महेंद्र परब, प्रशांत बुगडे, शरद जाधव आदी सेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ प्रवासी उपस्थित होते.