Tue, Jul 23, 2019 17:14होमपेज › Konkan › ड्रेझरद्वारे वाळू उपशामुळे आंबेत पुलाला धोका

ड्रेझरद्वारे वाळू उपशामुळे आंबेत पुलाला धोका

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:49PMमंडणगड : प्रतिनिधी

रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील सावित्री नदी बाणकोट खाडीपात्रातील संयुक्त रेती गटात शासनाचे सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून ड्रेझर्सद्वारे मोठ्या प्रमाणात सध्या रेतीचे उत्खनन सुरू आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडणार्‍या आंबेत-म्हाप्रळ खाडी पुलाला धोका असल्याने संभाव्य जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी म्हाप्रळ गावचे सामाजिक कार्यकर्ते बिलाल म्हाळुंगकर यांनी प्रशासनास साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. 

याबाबत म्हाळुंगकर  यांनी विभागीय कोकण आयुुक्त, मुख्यमंत्री,  पर्यावरणमंत्री यांना निवेदन दिले आहे. निवेदनातील मागणीनुसार, रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांच्या संयुक्त रेती गटात सावित्री नदी बाणकोट खाडीपात्रात शासनाच्या अटी व शर्थीनुसार रेती उत्खननाचा लिलाव करण्यात आला आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे. ठेकेदार प्रमाणापेक्षा जास्त रेतीचे उत्खनन करीत आहे व शासनाचा लाखो रुपयांचा महसूल त्यामुळे चोरीस जात आहे.

‘सीसीटीव्ही’च्या देखरेखीखाली रेती उत्खनन व विक्री करणे बंधनकारक असतानादेखील सीसीटीव्ही बंद करून प्रमाणापेक्षा जास्त रेती उत्खनन केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पर्यावरण खात्याचे नियमानुसार सकाळी सहा ते रात्री सहा वाजेपर्यंत रेती उत्खनन केले जाऊ शकते. मात्र, हा नियम संबंधित ठेकेदाराने धाब्यावर बसविला आहे व रात्रभर रेतीचे उत्खनन सुरु आहे. रात्रीच्या वेळेस उपसा केलेल्या मालाची चोरटी वाहतूक ड्रेझर्सच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा व अत्यंत महत्त्वाचा असलेला आंबेत-म्हाप्रळ खाडीपुलाला धोका निर्माण झाला आहे. 

यापूर्वी अनेकवेळा रेती वाहतूक करणारे बार्जेस पुलाच्या खांबांना धडकले आहेत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची पाहणी कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे. त्यामुळे या पुलाला धोका कायमस्वरूपी उद्भवलेला आहे. त्यामुळे बार्जेसची वाहतूक काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. याबाबतचे पत्र संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना देऊनही त्यांनी या गंभीर बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अशा अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे महाड पुलाची झालेली दुर्घटना अद्यापही ताजी असताना त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, त्यामुळे प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलणे गरजेचे असल्याचे म्हाळुंगकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

एकंदरीत, नियमांची पायमल्ली होऊन सुरु असणारे रेतीउत्खनन व वाहतूक यावर तात्काळ कारवाई नं केल्यास 5 फेब्रुवारी रोजी म्हाप्रळ तर बंदर येथे आपण खाडी पट्ट्यातील शेकडो ग्रामस्थांसह बेमुदत साखळी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा बिलाल म्हाळुंगकर यांनी दिला आहे.