Fri, Jul 19, 2019 17:41होमपेज › Konkan › डेरवण येथे ‘अनुराग’ रणगाड्याचे लोकार्पण

डेरवण येथे ‘अनुराग’ रणगाड्याचे लोकार्पण

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:18PM

बुकमार्क करा

सावर्डे : वार्ताहर

भारत- पाकिस्तान मध्ये 1971 मध्ये झालेल्या युद्धात वापरण्यात आलेल्या ‘अनुराग’ रणगाड्याचे उद्घाटन डेरवण येथील विठ्ठलराव जोशी क्रीडा संकुलावर करण्यात आले. गुरुवारी सकाळी 10 वाजता लेफ्टनंट कर्नल विराज लाड यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. उद्घाटनानंतर हा रणगाडा नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला. डेरवण येथील मैदानावर हा कायमस्वरूपी ठेवण्यात येणार आहे.

‘अनुराग’ रणगाडा पंजाबमधून डेरवण येथे दाखल झाल्यानंतर सोमवारी हा ‘व्हीजेसीटी’ क्रीडा संकुलावर दिमाखात बसविण्यात आला. त्याचे उद्घाटन लेफ्टनंट कर्नल (नि.) विराज लाड यांच्याहस्ते झाल्यानंतर  तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला.  1971 साली भारत-पाकिस्तान युद्धात पंजाब सीमेवर या रशियन बनावटीच्या  ‘यु-55-अनुराग’ या रणगाड्याचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर हा रणगाडा पंजाबमध्ये शासनाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला होता. 

तो भारतीय सैन्य दलातर्फे डेरवण येथील क्रीडा संकुलावर पाठविण्यात आला आहे. राज्यभरातून येणार्‍या विविध स्पर्धांमधील खेळाडूंना  प्रेरणा मिळावी, या मुख्य हेतूने तो डेरवण येथील या संकुलावरील उजव्या बाजूस दिमाखात  ठेवण्यात आला आहे.  हा  रणगाडा सावर्डे, डेरवणच्या  सौंदर्यात भर घालणार आहे. परिसरातील नागरिक, खेळाडू, विद्यार्थ्यांनी हा रणगाडा पाहण्यासाठी एकच  गर्दी केली आहे. या कार्यक्रमासाठी कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक नवल बजाज, मेजर आंब्रे,  श्रीकांत पराडकर व नौदलातील अधिकारी उपस्थित होते.