Mon, Jan 21, 2019 10:01होमपेज › Konkan › सावंतवाडी पोलिसांना महिलांनी विचारला जाब

सावंतवाडी पोलिसांना महिलांनी विचारला जाब

Published On: Jan 19 2018 1:52AM | Last Updated: Jan 18 2018 10:29PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

शहरात जुना बाजार चॅपेल गल्ली येथे चरस-गांजा पार्टीप्रकरणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आनारोजीन लोबो यांनी पोलिसांच्या मौनीबाबाच्या भूमिकेविरोधात गुरुवारी सावंतवाडी पोलिसांत धडक देत जाब विचारला. त्यांनी दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. ज्या व्यक्तीने मुला-मुलींना चरस पुरविला त्याच्यापर्यंत पोलिसांनी पोहोचावे; अन्यथा सर्व महिला 23 जानेवारी रोजी पुन्हा पोलिस स्थानकात धडकतील, असा इशाराही यावेळी लोबो यांनी पोलिसांना दिला.

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आनारोजीन लोबो, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही धडक दिली. महिला तालुका संघटक रश्मी माळवदे, शहरप्रमुख शब्बीर मणियार, भारती मोरे, रजनी मांडवकर, गृहलक्ष्मी वेंगुर्लेकर व अन्य महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

पोलिसांना लोबो यांनी सांगितले की, आमचा पोलिसांवर विश्‍वास आहे. त्यामुळे त्यांनी तपास करावा. नरेंद्र डोंगर परिसरात असे प्रकार होत असून, या डोंगराच्या पायथ्याशी सीसीटीव्ही लावा म्हणजे येणार्‍या-जाणार्‍यांवर नजर राहील. लोबो यांनी चार ते पाच जणांची नावे दिली असून, पोलिसांनी या सर्वांचा जाबजबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पोलिसांची कारवाई सुरू.