Sun, Aug 18, 2019 21:08होमपेज › Konkan › ‘त्या’ शिक्षकाचा निर्दयीपणे केला खून

‘त्या’ शिक्षकाचा निर्दयीपणे केला खून

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 10:23PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

अगदी सरावलेल्या खाटकाप्रमाणे कोंबडी किंवा बकर्‍याला ठार मारावे त्याप्रमाणे पोल्टी व्यवसायिक असलेल्या सुरेश  चोथे यांच्या कडून शिक्षक विजयकुमार गुरव याची हत्त्या केल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते. दरम्यान, सावंतवाडी पोलिसांनी विजयकुमार याचा मृतदेह ज्या मारूती व्हॅनमधून आंबोली-कावळेसाद पॉईंटवर आणला ती व्हॅन जप्त करून सावंतवाडी पोलिस स्थानकात आणली आहे.

गेले काही महिने संशयित आरोपी सुरेश चोथे व शिक्षक विजयकुमार गुरव यांची पत्नी संशयित जयलक्ष्मी गुरव हे एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. ही बाब चोथेच्या पत्नीच्या लक्षात येताच तीने सुरेशला याबाबत खडसावून ‘तुमचे हे काय चालले आहे, ताबडतोब तुमची थेरे बंद करा’ असा दम दिला होता. परंतु सुरेशने याकडे दुर्लक्ष केला होता.  पत्नीची नजर चुकवून सुरेश वारंवार विजयकुमार हा शाळेत असताना तिच्या घरी जात असे.  यातून सुरेश व त्याच्या पत्नीमध्ये बर्‍याचदा खटके उडत होते. सुरेशच्या पत्नीने आपले माहेर गाठले. त्यामुळे गेले काही महिने ती माहेरी होती असे तपासात पूढे येत आहे. ही बाब जयलक्ष्मीच्या मुलांनाही नेहमी खटकत होती. परंतु आई विरुद्ध कुणाला सांगणार? त्यामुळे ते मूग गिळून गप्प होते.

विजयकुमार गुरव याची सांपत्तीक स्थिती चांगली होती. त्याची आठ एकर शेती तसेच बंगला, गाडी आणि भाडोत्र्यांकडून मिळणारे घरभाडे यामुळे दरमहा मोठी रक्कम मिळत असे. या रकमेवर सुरेश चोथे याचा डोळा होता. जयलक्ष्मीला आपल्या सोबत घेवून त्याने यातील बरीच रक्कम आणि दागदागिने उडविले होते. 

अगदी हाकेच्या अंतरावर असलेला जयलक्ष्मीचा या विवाहित प्रियकराला डॉबरमॅन कुत्र्याचा अडसर होता. कुत्र्यामुळे आपले भांडे फुटेल व रात्री-अपरात्री आपणास तीच्याकडे जाता येणार नाही, यासाठी सुरेश व जयलक्ष्मी हिने कुत्र्यावर विषप्रयोग केला व त्याला संपविले.

गेले काही दिवस दोघांनाही विजयकुमार यांचा मोठा अडसर वाटत असल्यामुळे त्यांनी त्याला भरपूर दारू पाजून ठार मारण्याचा निर्णय घेतला. विजयकुमार याचा अडसर दूर झाल्यानंतर काही दिवस मुंबई, पुणे, दिल्ली येथे राहून प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा बंगल्यात येवून राहण्याचा त्यांचा प्लान होता. परंतु आपले मोबाईल फोन सुरू ठेवून एकमेकांशी संपर्क ठेवल्याने हे दोघेही संशयित पोलिसांच्या रडारवर आले आणि जाळ्यात अलगत अडकले. 

विजयकुमार यांचा निर्घृण खून करून मृतदेह आंबोली कावळेसादच्या दरीमध्ये फेकताना आणि त्यानंतर पोलिसांकडून अटक झाल्यानंतरही या दोघांच्या चेहर्‍यावर पश्‍चातापाचा लवलेशही नाही. पोलिस तपासामध्ये त्यांच्या मनामध्ये भीती नसल्याचे दिसत आहे. या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी वकील नको असेही न्यायालयात सांगितल्यामुळे हे दोघेही एकमेकाच्या प्रेमात आंधळे झाल्याचे चित्र दिसत आहे. वास्तवापासून दूर असल्याच्या या दोघांच्या मानसिकतेबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.