Tue, Nov 13, 2018 06:46होमपेज › Konkan › राणेंच्या मंत्रिपदासाठी स्वाभिमानची निवडणुकीतून पळवाट : विक्रांत सावंत

‘नितेश राजीनामा देवून वडिलांच्या पक्षात जावू शकत नाहीत’

Published On: Dec 16 2017 1:44AM | Last Updated: Dec 16 2017 1:44AM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यातील माटणे पंचायत समिती निवडणुकीत अखेरच्याक्षणी काँग्रेस आ.नितेश राणे यांच्या आदेशावरून निवडणुकीतून पळ काढत भाजपला समर्थन करणार्‍या स्वाभिमान व भाजपला शिवसेनेने जमिनदोस्त केले. नारायण राणे यांना राज्यात मंत्रिपद मिळण्यासाठी स्वाभिमान पक्षाने माटणे पं.स.मतदारसंघातून पळवाट काढली होती. शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी भाजप उमेदवाराचा 675 पेक्षा अधिक मतांनी पराभव करून दोडामार्ग तालुक्यातील मतदारांनी  पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे,अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याने या पूर्वीच सावंतवाडी व मालवण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या पारड्यात टाकला असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली देवगड मतदारसंघही आ.नितेश राणे यांच्याकडून हिसकावून घेईल, असा दावाही सावंत यांनी केला. 

वडिलांनी स्थापन केलेल्या पक्षाची पहिली सभा आ.नितेश राणेंनी गच्चीवरून पाहिली. जे स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देवून वडिलांच्या पक्षात जावू शकत नाहीत ते दुसर्‍याला ब्रह्मज्ञान सांगत सुटले आहेत, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.स्वाभिमानकडून शिवसेनेचा पराभव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांचे व भाजपचे प्रयत्न एकनिष्ठ शिवसैनिकांनी एकीच्या वज्रमुठीच्या आधारे निष्फळ ठरवले.