Mon, Aug 19, 2019 07:53होमपेज › Konkan › उपोषणाविरुद्ध उपोषण!

उपोषणाविरुद्ध उपोषण!

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 10:41PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

सावंतवाडी  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बुधवारी उपोषणाविरुद्ध आंदोलनाचा प्रकार पाहायला मिळाला. शासकीय मालमत्तेची आंबोली घाटातील चोरीप्रकरणी पर्यावरणप्रेमी  फाऊं डेशनच्या अध्यक्षा परिणिता वर्तक व उपाध्यक्षा प्रिया परब यांनी  आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, याप्रकरणी वारंवार ब्लॅकमेल करुन आंदोलनाची धमकी देत असल्याप्रकरणी सदाशिव उर्फ  दत्तू नार्वेकर या आंबोलीतील ठेकेदाराने कार्यालयासमारेच आपल्या पत्नीसह सृष्टी फाऊंडेशन तसेच माहितीच्या अधिकारात माहिती मागविणार्‍याकार्यकर्त्याविरोधात उपोषण, आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला सर्व ठेकेदारांनी उपस्थित राहून पाठिंबा  दिला. दरम्यान, मालमत्ता चोरी प्रकरणी चौकशी करण्याचे आश्‍वासन सा. बा. विभागाच्या प्रथम लिपीक ॠतुजा सरंबळेकर यांनी वर्तक यांना दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण सायंकाळी मागे घेतले. मात्र, नार्वेकर उभयतांचे  आंदोलन सुरुच होते.

बुधवारी सकाळी 11 वा. सृष्टी फाऊंडेशनच्या महिला कार्यकर्त्या सा. बा. विभाग कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची कुणकुण आंबोली माजी सरपंच तथा ठेकेदार सदाशिव उर्फ दत्तू नार्वेकर यांना लागली. त्यांनी उपोषणकर्त्यांसह त्यांचे समर्थक सा. बां. विभाग व शासकीय कार्यालयाकडे खोट्या तक्रारी करुन माहितीच्या  अधिकारात माहिती मागवून ब्लॅकमेल करुन आर्थिक मागणी करतात असा आरोप करत पत्नीसह उपोषण सुरू केले. या प्रकरणी आपणास व अन्य लोकांना शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास दिला जात असून संस्था व आंदोलकांची चौकशी करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. 

तर तालुक्यातील आंबोली घाटात धबधब्या शेजारी झालेल्या कामातील दगडी तोडी या शासकीय मालमत्तेची संबंधित शाखा अभियंता व ठेकेदार यांनी संगनमताने चोरी करुन शासकीय तोडी परस्पर विक्री केल्याचा प्रकार केला असून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी 16 फेब्रुवारीला केली होती. परंतु, याबाबत पुराव्याची मागणी सा. बां. विभागाने केल्यानंतर उर्वरीत दगडी तोडीची लिलाव प्रक्रिया झालेली नसल्याने शासकीय मालमत्ता चोरी प्रकरणी वेगळ्या पुराव्याची आवश्यकता नसल्याने पुन्हा दोन दिवसांत फौजदारी दाखल न केल्यास 21 फेब्रुवारीपासून कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचे लेखी पत्र दिले होते. त्यानुसार सृष्टी फाऊं डेशनच्या परिणिती वर्तक, प्रिया परब तसेच प्रणाली राऊत, संजीवनी मोर्ये, आयरीन डिसा आदी महिला सा. बां. कार्यालयासमोर उपोषणास बसण्यासाठी आल्या होत्या. मात्र, तत्पूर्वीच उपोषणस्थळी घातलेल्या मंडपाशेजारी दत्तू नार्वेकर व त्याच्या पत्नीने या उपोषणाविरोधात उपोषण आंदोलन सुरू केले. 

  त्यांना समर्थन देण्यासाठी सर्व ठेकेदार व राजकीय पदाधिकारी  नगराध्यक्ष बबन साळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्षा मनोज नाईक, न. प. सभापती सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, माजी उपसभापती बाबल आल्मेडा, ठेकेदार महेंद्र सांगेलकर, भाजपा तालुकाध्यक्ष महेश सारंग, ठेकेदार दया परब, अमित परब, रवी सावंत, सभापती आनंद नेवगी, मुन्ना कोरगावकर, सेजल नार्वेकर, अ‍ॅड. राघवेंद्र नार्वेकर, गोविंद खोर्जुवेकर, स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते केतन आजगावकर, गुरू मठकर, प्रसाद माने, जितू पंडित, वेर्ले उपसरपंच चंद्रकांत राणे, एस.पी. कन्स्ट्रक्शनचे सिद्धांत परब, संदीप सावंत, परेश धारगळकर, महेश पाटील, भाजपा शहर अध्यक्ष संजू शिरोडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, ठेकेदार अमेय आरोंदेकर  आदिंनी उपोषणस्थळी धाव घेतली. 

नगराध्यक्ष साळगावकर यांनी अशा प्रवृत्तींना थारा दिला जाऊ नये, असे मत व्यक्त करुन माहितीच्या अधिकाराने ब्लॅकमेलिंग करणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल व्हायला हवेत यासाठी आपण नार्वेकर यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. त्यांच्या समवेत नगरसेविका आनारोजीन लोबो होत्या. 

सृष्टी फाऊंडेशनच्या उपोषणकर्त्यांनी नगरपरिषदेची परवानगी न घेता उभारण्यात आलेला मंडप जप्त करण्याचे आदेश नगराध्यक्ष साळगावकर यांनी देताच आरोग्य विभागाचे अधिकारी दीपक म्हापसेकर व न. प. कर्मचार्‍यांनी तत्काळ हा मंडप जप्त केला. सर्व साहित्य काढून ताब्यात घेतले. 

 त्या जागेवर सृष्टी फाऊंडेशनच्या महिला उपोषणासाठी बसणार होत्या त्या जागेत ठेकेदारांनी आपल्या दुचाकी लावल्याने बसण्यासाठी जागा देण्याची मागणी सृष्टी फाऊंडेशनच्या वर्तक यांनी पोलिस आणि सा. बां. विभागाकडे केली असता आमच्या कार्यालयाच्या जागेत बसता येणार नाही, असे सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी सांगितल्याने  वर्तक यांनी कार्यालयासमोरील प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले. अखेरीस नार्वेकर यांच्या शेजारील जागा पोलिस दाजी सावंत यांनी रिकामी करुन दिल्यानंतर महिलांनी त्या जागेत उपोषण सुरू केले.  शेजारी शेजारी बसून दोन्ही गटाचे उपोषण सुरू होते. अखेरीस सा.बां. विभागाच्या सौ. सरंबळेकर यांनी उपअभियंता विजय चव्हाण यांच्यासह उपोषणकर्त्या वर्तक यांना याप्रकरणी चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर सृष्टी फाऊं डेशनने आपले उपोषण स्थगित केले. 

संबंधितांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आपले उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा दत्तू नार्वेकर यांनी देऊन पत्नीसह आपले उपोषण सुरुच ठेवले होते.