होमपेज › Konkan › ओटवणे पूल उद्घाटनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार

ओटवणे पूल उद्घाटनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 10:06PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : शहर वार्ताहर

गेली सात वर्षे रखडलेला ओटवणे पुलाचे उद्घाटन तत्काळ करावे, या मागणीसाठी ओटवणे ग्रा.पं.सदस्य तथा ओटवणे दलित विकास मंडळाचे अध्यक्ष राजेश उर्फ गुंडू जाधव तसेच ग्रामस्थांनी गुरुवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण केले.

तेरेखोल नदीवरील ओटवणे पुलासाठी सतरा वर्षे आंदोलन व मोर्चे काढल्यावर तेरा वर्षांपूर्वी या पुलाचे काम मार्गी लागले. पुलाच्या जोड रस्ताचे खडीकरण व डांबरीकरण होऊन सात वर्षे पूर्ण झाली. मात्र बांधकाम विभागाने अद्यापही या पुलाचे उद्घाटन केले नव्हते.

दरम्यान, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी गुंडू जाधव यांच्याशी चर्चा केली. सदर पुलावरुन गेली आठ वर्षे वाहतूक सूरू असल्याने उद्घाटनासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल व त्यानंतर उद्घाटनची कार्यवाही करण्याचे आश्‍वासन सुरेश बच्चे यांनी दिल्यावर जाधव यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी माजी सभापती मंगेश तळवणेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, उमेश गावकर व ग्रामस्थ उपस्थित होते. बांधकाम विभागाच्या या कारभाराविरोधात तसेच ओटवणे पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रश्‍नी  30 नोव्हेंबर रोजी सा. बां. विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राजेश जाधव यांनी दिला होता.