Thu, Jun 27, 2019 13:42होमपेज › Konkan › सावंतवाडीत आजपासून ‘सुंदरवाडी महोत्सव’ ची धूम 

सावंतवाडीत आजपासून ‘सुंदरवाडी महोत्सव’ ची धूम 

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 10:03PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

सावंतवाडी शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेला नवा साज चढविणारा व सावंतवाडी शहराची नवी ओळख निर्माण करणारा सुंदरवाडी महोत्सव शुक्रवार  23 ते  25 फेब्रुवारी  या कालावधीत साजरा होत आहे.  प्रसिद्ध सिने तारका, गायक,गायिका, लावणी आणि  कॉमेडीयन यांची धम्माल आणि बरेच काही या महोत्सवात पहायला मिळणार आहे.  या महोत्सवाचा  शुभारंभ  युवा नेते आ. नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून सांगता समारंभ माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे, सौ. नीलम राणे यांच्या उपस्थित होणार आहेत. 

सावंतवाडी जिमखाना मैदानावर होणार्‍या या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवार  23 फेब्रुवारीला शुभारंभ प्रसंगी रुपेश चव्हाण प्रस्तुत ‘सप्तसूर तारकांच्या साक्षीने’ हा नृत्याविष्काराचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले, केतकी पालव, आघाडीची नृत्यांगना प्रांजळ पालकर यांच्या नृत्याचा अविष्कार अनुभवायला मिळणार आहे.  यांच्यासह लावणी साम्राज्ञी प्रियांका जाधव आणि आयटम गर्ल निशा बारोत यांची अदाकारी पहायला मिळणार आहे.

 विनोदाची रंगभूमी गाजवणारे  विनोदवीर संदीप गायकवाड, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे यांच्या विनोदी किश्श्यांची हास्य मेजवानी अनुभवता येणार आहे.  शनिवार  24  रोजी रुपेश चव्हाण व ऐश्‍वर्या पालकर प्रस्तुत ‘रंग मराठी मनाचा’ हा लोककला संस्कृतीवर आधारित कार्यक्रम होईल. सुमारे  72 कलाकारांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम खास आकर्षण आहे. गौरव पाटील व श्रुती पाटील यांची जुगलबंदी विशेष आकर्षण आहे. त्याशिवाय शुभांगी केदार व रंजेश पटेल यांचीही  पेशकस पहायला मिळणार आहे.  मराठी बाणा फेम स्वीटी सदाफुले हिच्या लावणीचा ठसकेबाज कार्यक्रम खास मनोरंजनाचत्मक पर्वणी असेल.

महोत्सवाची सांगता  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे, सौ. नीलम राणे यांच्या उपस्थितीत  रविवार  25 रोजी होणार आहे. या दिवशी महाराष्ट्राचा बुलंद आवाज गायक आदर्श शिंदे, वैशाली सामंत, राहुल सक्सेना यांची सुरेल मैफल होणार आहे. एकंदरीत सावंतवाडीकर आणि जिल्हावासीयांसाठी ही सांस्कृतिक मेजवानी असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र 
स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केलेआहे.

नारायण राणेंच्या भाषणाकडे लक्ष 

गतवर्षी या महोत्सवाचे दुसरे वर्ष होते तेव्हा नारायण राणे हे काँग्रेस पक्षात होते. यावर्षी तिसरे यशस्वी वर्ष साजरे करत असताना नारायण राणे यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष म्हणून राणे काय संदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.