Sat, Jul 20, 2019 10:39होमपेज › Konkan › मळगाववासीयांची वन विभागावर धडक

मळगाववासीयांची वन विभागावर धडक

Published On: Aug 24 2018 10:35PM | Last Updated: Aug 24 2018 9:58PMसावंतवाडी : वार्ताहर

सावंतवाडी शहराच्या हद्दीवरील मळगाव भागात रानगव्यांना रोखण्यासाठी वन विभागाकडून उभारण्यात येणारे सौरकुंपणाचे काम अर्धवट स्थितीत सोडल्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी  शुक्रवारी पुन्हा येथील वन खात्यावर धडक दिली. यावेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना शेतकर्‍यांनी धारेवर धरत जोपर्यंत हे काम सुरू होत नाही तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, असा पवित्रा घेतला. 

मळगाव पंचक्रोशीतील शेतकर्‍यांच्या या मागणीला सर्वपक्षीयांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. अखेर सायंकाळपर्यंत ठेकेदाराला पाचारण करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर काही काळासाठी शेतकर्‍यांनी माघार घेतली. दरम्यान, संबंधित ठेकेदाराकडून येत्या आठ दिवसांत काम पूर्ण करून घेण्याचे लेखी आश्‍वासन  उपवनसंरक्षक चव्हाण यांनी दिले. 

सावंतवाडीपासून जवळच हद्दीवर असलेल्या मळगाव-वेत्ये ते नेमळे या गावामध्ये रानगव्यांपासून भातशेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी या भागातील वनहद्दीत वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी साडेदहा किमी.पर्यंत अंतराचे सौरकुंपण उभारण्यात येणार आहे. या कामासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम इस्लामपूर येथील ठेकेदाराला देण्यात आले आहे. मळगाव येथे झालेल्या ग्रामसभेत संबंधित ठेकेदाराने जानेवारी 18 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, आता सात महिने पूर्ण होत आले तरीही फक्त दीड किमी.पर्यंतच पोल उभारून ठेकेदाराने काम अर्धवट सोडले आहे. परिणामी रानगव्यांनी शेतकर्‍यांची आणखी नुकसानी झाली आहे. याबाबत मळगाव, वेत्ये, नेमळे भागातील शेतकर्‍यांनी शुक्रवारी पुन्हा याप्रश्‍नी वनविभागाचया कार्यालयात धडक दिली. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, माजी सभापती राजू परब, शेतकरी हनुमंत पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराव घालण्यात आला.

 संजू परब यांनी शेतकर्‍यांना गेली कित्येक महिने आश्‍वासन दिले जाते, प्रत्यक्ष काम कधी पूर्ण होणार? अन्यथा दुसरा मार्ग अवलंबवा लागेल, वनविभागाची जबाबदारी असल्याने काम पूर्ण करून घेतले पाहिजे असे सांगितले. माजी सभापती राजू परब यांनी सातत्याने सौरकुंपणाचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले जाते, प्रत्यक्षात महिनाभर हे काम बंद आहे त्यामुळे ठेकेदाराला येथे बोलवावे अन्यथा सौरकुंपणाचे सर्व पोल वनविभागाच्या कार्यालयात आणून टाकू असा इशारा दिला. गुरू गावकर यांनी आतापर्यंत शेतकर्‍यांनी झालेली नुकसानभरपाई द्यावी त्यानंतरच काम सुरू करावे, असे सांगितले. तर काम अर्धवट असताना देखील 14 लाख रुपयांचे बिल ठेकेदाराला का अदा करण्यात आले? असा जाब यावेळी उपवनसंरक्षक यांना विचारण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक यांनी येत्या 8 दिवसात काम पूर्ण करण्याचे आपल्याला लेखी आश्‍वासन द्यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी लावून धरली. तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही असा पवित्रा घेतला. 

यावेळी समाधान चव्हाण यांनी दीड किमी.पर्यंत 200 पोल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. अजून 1600 पोल मागवण्यात येणार आहेत. ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेतले जाईल असे सांगितले. मात्र, शेतकर्‍यांचे या उत्तरावर समाधान न झाल्याने अगोदर सायंकाळपर्यंत ठेकेदाराला बोलावण्यात यावे, अशी मागणी केली. अखेरीस उपवनसंरक्षक चव्हाण यांनी ती मागणी मान्य करत ठेकेदार आणि शेतकर्‍यांची भेट घालून देण्याच्या अटीवर काही कालावधीसाठी शेतकर्‍यांनी माघार घेतली. सायंकाळी पुन्हा येथील कार्यालयावर शेतकरी उपस्थित होते. मात्र उशिरापर्यंत संबधीत ठेकेदार कार्यालयात दाखल झाला नव्हता.