Mon, Apr 22, 2019 21:38होमपेज › Konkan › काजूला १८० रुपये उच्चांकी दर

काजूला १८० रुपये उच्चांकी दर

Published On: Apr 10 2018 10:33PM | Last Updated: Apr 10 2018 9:43PMसावंतवाडी : दत्तप्रसाद पोकळे

या वर्षी काजू  बी प्रतिकिलो 180 रुपये अशा उच्चांकी दराने खरेदी होत आहे.  मात्र, वातावरणात सातत्याने झालेले बदल काजू पिकास मारक ठरल्याने यंदा काजूचे उत्पादन कमालीचे रोडावले आहे. यामुळे दरवाढ झाली असली तरी उत्पादक शेतकर्‍यांना फारसा लाभ होणार नाही.  

राज्यात  सर्वात जास्त काजू उत्पादन होणार्‍या सिंधूदुर्ग जिल्ह्यात यंदा काजू उत्पादनात सरासरी 40 ते 50 टक्के घट झाली आहे. कमी उत्पादनामुळे उच्चांकी दराचा फारसा फायदा होत नसल्याने काजू बागायतदार अडचणीत आला आहे.

गतवर्षी जिल्हयात काजूचे विक्रमी उत्पादन झाल्याने बागायतदार व काजू प्रक्रिया उद्योजकांना फायदा झाला होता. चांगला पाऊस व वेळेवर पडलेली थंडी असे अनुकूल वातावरण असल्याने यंदाही काजूचे भरघोस पीक येण्याची अपेक्षा होती. मात्र, जानेवारीपासून हवामानात वेगाने बदल झाल्याने काजूच्या उत्पादनावर परिणाम झाला. गेले तीन महिने वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी ढगाळ,मधेच पडणारी थंडी, वाढणारा उष्मा व अचानक पडलेला पाऊसयामुळे टी मॉस्कीटो बगचा प्रभाव वाढून काजूचा मोहोर जळाला. काजूच्या पिकाला वातावरणातील बदलाची दृष्ट लागल्याने यंदा उत्पादन घटले आहे. सर्वाधिक काजू मिळणार्‍या सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या तालुक्यांसह संपूर्ण जिल्हयात काजूचे उत्पादन 40 ते 50 टक्यांनी घटले आहे. 

आता काजूच्या उत्पादनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, वातावरणातील बदलाचे दुष्टचक्र कायम असल्याने किती काजू हाती पडणार या चिंतेत बागायतदार व काजू प्रक्रिया उद्योजक आहेत.
कोकणातील काजू क्षेत्र 1 लाख 86 हजार हेक्टर आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 66 हजार 700 हेक्टर क्षेत्रात काजू लागवड आहे.  पैकी 45 हजार 600 हेक्टर क्षेत्रात उत्पादन घेतले जाते.  प्रति हेक्टरी 1100 किलो काजू बी चे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याचे काजू बियांचे एकूण उत्पादन 47 हजार 300 मेट्रीक टन आहे. या उत्पादनापैकी स्थानिक बाजारपेठेत 60 टक्के म्हणजे 28 हजार 400 मे. टन काजू बीची विक्री होते. जिल्ह्यातील एकूण उत्पादनापैकी 20 टक्के  म्हणजे 9 हजार 500 मे. टन काजू बीची जिल्ह्याबाहेर निर्यात होते. 4 हजार 500 मेट्रीक टन काजू राज्याबाहेर पाठवला जातो. खाण्यासाठी 4 हजार मे. टनचा वापर केला जातो. राज्यात काजू उत्पादनात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. 

सेंद्रिय उत्पादनामुळे येथील काजू उच्च प्रतिचा समजला जातो.साहजिकच येथील काजूला मोठी मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात काजुवर प्रक्रिया करणारे 2000 च्या आसपास कारखाने आहेत. मात्र, यंदा उत्पादन घटल्याने काजू बागायतदार व उद्योजक यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.