Thu, Jul 18, 2019 16:32



होमपेज › Konkan › हिटलिस्टवरील साहित्यिकांना संरक्षण देणार : ना. केसरकर

हिटलिस्टवरील साहित्यिकांना संरक्षण देणार : ना. केसरकर

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Aug 31 2018 11:38PM



सावंतवाडी : प्रतिनिधी 

कॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांनंतर आता राज्यासह सावंतवाडीतील साहित्यिकांची नावे हिटलिस्टवर आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अशा सर्व साहित्यिकांना  गृह विभागातर्फे सरंक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

 सावंतवाडीत ते पत्रकारांशी बोलत होते.  ना. केसरकर म्हणाले, उजव्या विचारसरणीचे माओवादी राष्ट्रविरोधी असल्यामुळे त्यांच्याशी कुणीही संपर्क ठेवता कामा नये. त्यांना हत्यारे मिळावी यासाठी प्रयत्न करणे हा गुन्हा आहे. याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर झाल्यानंतर या सर्वांना पोलिस कोठडी दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करता येईल. या प्रकरणाचे कुणीही राजकारण करू नये, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले. राज्यातील काही साहित्यिकांची नावे मारेकर्‍यांच्या हिटलिस्टवर आहेत. यामध्ये सावंतवाडीतील एका लेखकाचा समावेश आहे, याकडे ना. केसरकर यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, अशा सर्व साहित्यिकांना संरक्षण देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. डॉ. दाभोलकर व अन्य पुरोगामी व्यक्तींची हत्या केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या मारेकर्‍यांचा नेमका कोणत्या संस्थेशी संबंध  आहे,  याचा तपास गृह विभाग करीत आहे. या सर्व प्रकरणांच्या तपासामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याची पुस्ती त्यांनी जोडली. या प्रकरणांचा जलद व सुयोग्य तपास व्हावा, यासाठी कर्नाटक पोलिसांसह, केंद्रीय गृह मंत्रालयाची मदत घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.