होमपेज › Konkan › वाफोलीतील २२०० कोटींचा प्रकल्प विकासाचा माईलस्टोन

वाफोलीतील २२०० कोटींचा प्रकल्प विकासाचा माईलस्टोन

Published On: Jul 18 2018 10:41PM | Last Updated: Jul 18 2018 10:03PMसावंतवाडी : प्रतिनिधी

बांदा-वाफोली येथे सुरू होणारा हा स्ट्रिम क्लाऊड जागतिक दर्जाचा 2200 कोटी रुपयांचा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी माईलस्टोन ठरेल. यापुढे पंधरा दिवसांनी एका मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन करून येत्या वर्षभरात जिल्ह्याचा कायापालट करणार असल्याचा विश्‍वास गृह, वित्त, नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी  व्यक्त केला.

ना. केसरकर यांच्या हस्ते बांदा - वाफोली गावाच्या सीमेवर स्ट्रिम क्लाऊड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या पहिल्या डाटा सेंटर प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. यावेळी खा. विनायक राऊत, सौ.पल्लवी केसरकर, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण,  पै काणे गु्रपचे अध्यक्ष अतुल पै काणे, स्ट्रिमकास्ट गु्रपचे अध्यक्ष निमित पांड्या, गोव्याचे उद्योजक हर्षवर्धन सापळे, सावंतवाडी पोलिस निरीक्षक सुनील धनावडे, राघोजी सावंत आदी उपस्थित होते.

स्टिम क्लाऊड या जागतिक दर्जाच्या कंपनीने 2200 कोटी रुपयांची गुुंतवणूक करून भारतातील पहिला गणिती डाटा सेंटरचा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुमारे 1500 हून अधिक जणांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. लवकरच या ठिकाणी चष्म्याचा कारखानादेखील उभारण्यात येणार असल्याने बांदा हे माहिती तंत्रज्ञानाच्या जागतिक नकाशावर झळकणार आहे. यासाठी राजकीय हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र येऊन विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्त व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

 ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून संपूर्ण देशात ओळखला जातो. जिल्ह्यात अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरण अबाधित ठेऊन जिल्ह्यात येणार्‍या कंपन्यांसाठी जिल्ह्याचे दार नेहमीच उघडे आहे. याठिकाणी औद्योगिक क्रांती आल्यास त्याचा फायदा येथील तरुणांना व पर्यायाने जिल्ह्याच्या विकासाला होणार आहे. त्याची सुरुवात बांद्यातून झाली आहे. पालकमंत्री केसरकर म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुण हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात यावा यासाठी हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे. येथील तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी सावंतवाडी शहरात साई सेंटर फॉर एक्सलन्स हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर येथील तरुणांना या कंपनीत सामावून घेण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान कंपनीबरोबरच याठिकाणीच गोव्यातील कंपनीचा चष्म्याचा कारखाना लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाची देणगी आहे. त्यामुळे येथील पर्यटन अबाधित राहण्यासाठी वेगवेगळ्या रोजगारपूरक कंपन्या जिल्ह्यात आल्या पाहिजेत. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पाचव्या क्रमांकावर आहे. येथे औद्योगिक क्रांती झाल्यास हेच दरडोई उत्पन्न पहिल्या क्रमांकावर येईल. 

खा. विनायक राऊत म्हणाले, दीपक केसरकर यांनी समाजसेवेचे व्रत सुरू ठेवावे. जागतिक दर्जाच्या कंपनीला बांद्यात आणण्याचे श्रेय हे केसरकर यांनाच द्यावे लागेल. बांदा सरपंच मंदार कल्याणकर म्हणाले, बांदा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शहरात येणार्‍या सर्व प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करु. मात्र, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कंपनीचे अध्यक्ष निमित पांड्या यांनी कंपनीची निर्मिती, उद्देश व येथील प्रकल्पाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी केले. यावेळी बांदा व दशक्रोशीतील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते . यावेळी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या आठ संस्थांना आर्थिक मदतीचे धनादेश सुपुर्द करण्यात आले.