होमपेज › Konkan › धनगर समाजासाठी सावंतवाडीत समाजभवन!

धनगर समाजासाठी सावंतवाडीत समाजभवन!

Published On: Aug 12 2018 10:30PM | Last Updated: Aug 12 2018 10:07PMसावंतवाडी :

गेली वर्षानुवर्षे प्रगतीपासून वंचित राहिलेल्या दर्‍या खोर्‍यातील धनगर समाजाने संघटीत होण्याची आवश्यकता आहे. या समाजाच्या भौतिक विकासासाठी सावंतवाडी येथे सुसज्ज  समाज भवन उभारणार असून त्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. 

 धी धनगर समाज उन्‍नती मंडळ मुंबई शाखा - सावंतवाडी यांच्या माध्यमातून येथील तालुका स्कूल सभागृहात समाजातील विद्यार्थी गुणगौरव समारंभ तसेच पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुण्यथिती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे, नायब तहसीलदार विजय वरक, मुंबई मंडळ सरचिटणीस नवल गावडे, सचिव विठ्ठल कुंभार, सीताराम कोळेकर,  तालुकाध्यक्ष सीताराम लांबर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सखाराम झोरेे आदी उपस्थित होते.

श्री. साळगावकर म्हणाले, धनगर समाजाच्या विकासासाठी  समाजभवन  आवश्यक आहे. त्यासाठी आपले प्रयत्न असून यासाठी समाजाने माझ्या पाठिशी राहून  वेळप्रसंगी आंदोलनांची तयारी दाखवावी. समाजातील कित्येक विद्यार्थी शैक्षणीक गुणवत्तेत पुढे असून त्यांनी स्पर्धा परीक्षेत भाग घ्यावा, असे ते म्हणाले. 

प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे यांनी समाजाचा वारसा असलेल्या फुले, शाहू, अहिल्याबाई होळकर यांची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी विशद केली.  या समाजासाठी अनेक महात्म्यांनी लढा दिला तरीही हा समाज दर्‍या खोर्‍यात राहून अद्यापही विकास प्रक्रियेपासून वंचित आहे.  या समाजाला पुढे जायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. पूर्वी ठराविक समाजाकडे शिक्षणाची मक्‍तेदारी होती. मात्र, आता धनगर समाज शिक्षण, नोकरी आदीमध्ये हळूहळू पुढे येत आहे. सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने सुरू आहेत. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, आम्हाला नको तर कोणालाच नको ही भूमिका चुकीची असून आरक्षण म्हणजे नोकरी मिळण्याचे साधन नसून ते त्या धर्माचे प्रतिनिधीत्व आहे, असे ते म्हणाले.

तालुकाध्यक्ष सीताराम लांबर यांनी समाजातील मुलांच्या विकासासाठी तसेच त्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी मंडळातर्फे लवकरच दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर भरवण्यात येईल. गेली पाच वर्षे विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जात आहे. या समाजाची गेली कित्येक वर्षांची मागणी असून जिल्ह्यात समाज भवन व बहुउद्देशीय हॉल उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.  कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.