Thu, Sep 20, 2018 06:26होमपेज › Konkan › आंबोली घाटमार्ग पर्यायी रस्त्यासाठी १ कोटी ७५ लाखांची तरतूद 

आंबोली घाटमार्ग पर्यायी रस्त्यासाठी १ कोटी ७५ लाखांची तरतूद 

Published On: May 15 2018 10:43PM | Last Updated: May 15 2018 10:43PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

आंबोली घाट रस्ता सद्यस्थितीत  निर्धोक असून या घाटाच्या पर्यायी मार्गाचा तिढा ही सुटला असून लवकरच पर्यायी रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. बजेटमध्ये या रस्त्यासाठी एक कोटी 75 लाखांची तरतूद केली असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे - पाटील यांनी दिली.

सद्यःस्थितीत वापरात असलेला आंबोली घाटातील रस्ता हा वापरास निर्धोक आहे. त्याठिकाणी कोसळणार्‍या दरडी, दगड यांच्यासमवेत संरक्षक कठडे मजबूत करण्यात आले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी हा घाटमार्ग पावसाळ्यात निर्धोक असल्याचे  बच्चे यांनी सांगितले. 

सावंतवाडी तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या  आंबोली हिल्स या पर्यटन स्थळाला जोडणार्‍या या घाट रस्त्याला पर्याय ठरणार्‍या केसरी-फणसवडे-चौकुळ  रस्त्यासाठी लागणार्‍या जमिनीचे प्रस्ताव पंधरा दिवसांत संबंधित खात्याकडे दाखल करण्यात येणार आहे. त्यात खासगी, वनजमीन आणि वनसंज्ञा क्षेत्राचा समावेश आहे. बजेटमध्ये या रस्त्यासाठी एक कोटी 75 लाखांची तरतूद केल्यानंतर याबाबतचे प्रस्ताव तयार करण्यास गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

 श्री. बच्चे म्हणाले, आंबोली घाट कोसळून सहा ते सात वर्ष पूर्ण झाली. मात्र, घाट रस्ता संस्थानकालीन असल्याने दरी खोर्‍यात आणि उंच टेकड्यांच्या ठिकाणी मजबुतीकरण करणे जोखमीचे आहे. तरी बांधकाम विभागातर्फे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यायी रस्त्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. 18 किलोमीटर लांबी असलेल्या  या रस्त्याच्या जमीन संपादनासाठी एक कोटी  75 लाख रुपयांचा निधी खात्याला मिळाला आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

रस्त्यासाठी ताब्यात घेण्यात येणार्‍या जमिनीचा ले आऊट आणि अन्य प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात काही जमीन ही वनसंज्ञा आणि वनविभागाच्या मालकीची असल्यामुळे ती ताब्यात घेण्यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव देण्यात येणार आहे. बरीचशी जमीन ही खासगी असल्यामुळे त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.