होमपेज › Konkan › राजमाता सत्वशीलादेवी भोसले पंचत्त्वात विलीन 

राजमाता सत्वशीलादेवी भोसले पंचत्त्वात विलीन 

Published On: Jul 19 2018 10:31PM | Last Updated: Jul 19 2018 10:04PMसावंतवाडी : प्रतिनिधी

सावंतवाडी संस्थानच्या राजमाता तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्‍वस्त हर हायनेस सत्वशीलादेवी शिवरामराजे भोसले यांचा देह आज पंचत्त्वात विलीन झाला. राजमाता यांच्या अंत्ययात्रेला शोकाकूल वातावरणात राजवाडा येथून गुरुवारी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास सुरुवात झाली. अंत्ययात्रेपूर्वी जिल्हा पोलिस पथकाने मानाची सलामी दिली. राजवाडा ते चितारआळी व चितारआळी ते माठेवाडा अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अवघी सावंतवाडीनगरी सुन्न झाली होती. अंत्यविधीपूर्वी तीनवेळा आसमंतात बंदुकीच्या फैरी देत राजमातांना मानवंदना देण्यात आली. 

त्यानंतर  शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार पार पडले.  पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम आदींनी राजमातांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. आठवणींचा विशाल सागर प्रत्येकाने डोळ्यात साठवत, सुंदरवाडीच्या गौरवशाली परंपरेच्या शिल्पकार, राजमाता यांना सावंतवाडीकरांनी जड अंतःकरणाने अखेरचा भावपूर्ण निरोप दिला. हृदय हेलावणार्‍या या प्रसंगाने सर्वांचेच डोळे पाणावले. 

अंत्ययात्रेत जिल्हावासीय सहभागी

या अंत्ययात्रेत पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार सतीश कदम, पोलिस निरीक्षक सुनील धनावडे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब आदींसह हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. 

गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या

राजमातांचे बुधवारी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास वृद्धापकाळाने सावंतवाडी येथे निधन झाले. त्या  83 वर्षांच्या होत्या. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर घरी आणल्यावर त्यांची प्राणज्योत मालवली. 

जड अंतःकरणाने अखेरचा निरोप

सावंतवाडी संस्थानच्या त्या शेवटच्या राजमाता ठरल्या. इतिहासात सुंंदरवाडी संस्थानचे सोनेरी पान जोडणार्‍या राजमाता यांच्या जाण्याने सुंदरवाडी संस्थानच्या गौरवशाली परंपरेची अस्मिता काळाच्या पडद्याआड गेली आहे. कला आणि समाज यांच्यातील दुवा बनलेल्या राजमातांच्या अखेरच्या दर्शनाने चाहते हळहळले. जड अंतःकरणाने सर्वांनी राजमातांना भावपूर्ण निरोप दिला. 
सांस्कृतिक वारसा हरपला

सकाळी 8 वाजता त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले.  सावंतवाडीकरांनी साश्रू नयनांनी राजमातांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले. ‘सावंतवाडीचा सांस्कृतिक वारसा हरपला’ अशा शब्दांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राजमातांना आदरांजली वाहिली. यावेळी माजी आमदार शिवराम दळवी, पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, पी.एफ. डॉन्टस, विक्रांत सावंत, सतीश पाटणकर, पालिका अभियंता तानाजी पालव तसेच सर्व नगरपरिषद कर्मचारी आदींनी राजवाडा येथे धाव घेत त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. 

सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम

बडोदा घराण्याच्या राजकन्या सत्वशीलादेवी भोसले यांंचा विवाह सावंतवाडीचे राजे शिवरामराजे भोसले यांच्याशी झाला होता. त्या सावंतवाडीत शिवरामराजे यांच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेत. त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या होत्या. शिवरामराजे यांच्या निधनानंतर त्यांची सर्व भिस्त ही राजमातांवर होती. राजमातांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. शिक्षणक्षेत्रात तर त्यांनी आमूलाग्र क्रांती घडवून आणत पंचम खेमराज महाविद्यालयाचा कारभार योग्य प्रकारे हाताळला. 

...अन् अखेरचा श्‍वास घेतला

राजमाता या अलिकडच्या काळात वृद्ध झाल्याने त्यांनी थोडी विश्रांती घेतली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र, गेल्या एक महिन्यापासून त्यांना थोडे अस्वस्थ वाटत असल्याने येथील राजवाड्यातच ठेवण्यात आले होते. वैद्यकीय टीम सतत प्रकृतीवर लक्ष ठेवून होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत चालला होता. त्यातच बुधवारी रात्री 9.14  मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. यावेळी मुलगा खेमसावंत भोसले, सून शुभदादेवी भोसले, नातू लखमराजे भोसले आदी उपस्थित होते. राजमाता यांच्या निधनाचे वृत्त सावंतवाडीत पसरताच एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. 

सावंतवाडी बाजारपेठ बंद

गुरुवारी सकाळपासून राजवाड्यात राजमाताचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. तर त्यांच्या निधनाने  येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, मिलाग्रीस हायस्कूल, कळसुलकर हायस्कूलना   सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. तर सावंतवाडी बाजारपेठ बंद करून राजमातांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले.