होमपेज › Konkan › रेल्वे टर्मिनसचा विकास न झाल्यास आंदोलन

रेल्वे टर्मिनसचा विकास न झाल्यास आंदोलन

Published On: Jul 21 2018 10:45PM | Last Updated: Jul 21 2018 10:08PMसावंतवाडी : 

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला. मात्र, टर्मिनस दर्जाच्या कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाही. या टर्मिनसचा विकास सहा महिन्यात न झाल्यास  तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे  निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनाला  देण्यात आला. रेल्वे पोलिस व जिल्हा पोलिस यंत्रणेचा कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. टर्मिनसचे उद्घाटन करून विकासाचे गाजर दाखवून सिंधुदुर्गातील व सावंतवाडीतील जनतेची फसवणूक करण्यात आली. याबाबत भाजप व शिवसेना सरकारचा घोषणा देत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. 

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देणार अशी घोषणा करुन अद्यापपर्यंत कार्यवाही न झाल्याबाबत सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रवींद्र म्हापसेकर यांनी कोकण रेल्वे महाव्यवस्थापक, नवी मुंबई यांना निवेदन सादर केले.कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य बाळा गावडे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष  रवींद्र म्हापसेकर, शहर अध्यक्ष बाबल्या दुभाषी,महिला तालुका अध्यक्ष 
अमिदी मेस्त्री यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

सावंतवाडी रोड रेल्वेस्थानक हे जिल्ह्यातील ‘अ’ दर्जा असलेले रेल्वे स्थानक आहे. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी  शासनाने मोठा गाजावाजा करीत लाखो रुपये खर्च करुन टर्मिनसचे भूमिपूजन केले. परंतु, टर्मिनस म्हणून आजमितीपर्यंत कोणत्याही सोयीसुविधा प्रवाशांना उपलब्ध होत नाहीत. लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्थानकामध्ये थांबा मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस ही गाडी फलाट क्र. 3 ऐवजी फलाट क्र. 1 वरुन सोडण्यात यावी, मुख्य फलाट तसेच इतर फलाटावर शेड उभारावी तसेच इतर फलाटावंर स्वच्छतागृहांची सोय करावी,रेल्वे प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी अन्यथा फलाटावर अथवा रेल्वे आवारात व्यवसाय करण्याकरिता स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत, पूर्वीच्या सावंतवाडी - मळगाव - मळेवाड या जुन्या रस्त्यावरुन सावंतवाडी रेल्वे स्थानकांपर्यंत जोड रस्ता करावा.सावंतवाडी स्थानकावर थांबत असणार्‍या गाडयांना दिवा स्टेशनला थांबा द्यावा,आदी मागण्या  निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.