Tue, Nov 20, 2018 19:15होमपेज › Konkan › आरक्षणासाठी एक व्हा!

आरक्षणासाठी एक व्हा!

Published On: Aug 09 2018 10:27PM | Last Updated: Aug 09 2018 9:49PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

‘कोण सांगता देवचय नाय, घेतल्याशिवाय रवाचयं नाय, आरक्षण आमच्या हक्काचा, नाय कोणाच्या बापाचा’ अशा घोषणा देत सकल मराठा समाजाच्या जेलभरो आंदोलनाला सावंतवाडीत सकाळी 9 वा. पासून सुरुवात झाली. आंदोलनात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील मराठा बांधव आरपीडी हायस्कूल समोर एकवटले होते. यावेळी मार्गदर्शन करताना विक्रांत सावंत म्हणाले, आंदोलनात सहभागी ज्येष्ठ मंडळीना  आरक्षणाचा  फायदा होणार नाही, परंतु त्यांच्या ‘लढ’ या शब्दामुळे भावी पिढीला आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. मराठा आरक्षणासाठी क्रांती घडवायची असेल तर एक व्हा. असे आवाहन त्यांनी केले. 

 सीताराम गावडे म्हणाले,मराठा समाजामध्ये देश बंद पाडण्याची ताकद आहे. मात्र यासाठी समाजाच्या सर्व पक्षीय नेत्यांनी राजकीय पादत्राणे बाहेर ठेऊन आंदोलनात सहभागी होणे आव्शयक आहे.  विकास सावंत, अण्णा केसरकर, अ‍ॅड. संदीप निंबाळक र  यांनीही  मार्गदर्शन केलेे. 

 या नंतर ‘एक मराठा, लाख मराठा’ च्या  घोषणा देत  सकल मराठा समाजचे समन्वयक विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखालील आंदोलक ‘जेल भरो’ साठी  पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले.  माजी आ. शिवराम दळवी, जिल्हा बँकेचे संचालक विकास सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, मनोज नाईक,आदींसह हजारो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. मोर्चाच्या  अग्रभागी मोठ्या संख्येने महिला होत्या.

मोती तलावाच्या काठावरुन निघालेला हा मोर्चा ह. हा. स्व. शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याजवळ आला असता विक्रांत सावंत यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व मेजर शहीद कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली अर्पण करुन हा मोर्चा घोषणाबाजी करीत पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाला.

या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. अत्यंत शांततेत हा मोर्चा पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी मोर्चा पोलीस थानकासमोर बॅरेकेटस लावून व पोलिसांचे कडे करुन अडविला. त्यानंतर सर्वांना अटक करुन सोडून देण्यात आले.

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून एस.टी. गाड्या बंद होत्या. परिणामी त्याचा फटका प्रवासी व विद्यार्थ्यांना बसला. काही व्यापार्‍यांनीही आपली दुकाने  बंद ठेवली होती. त्यामुळे बाजारात तुरळक गर्दी दिसत होती.