Fri, Apr 19, 2019 12:18होमपेज › Konkan › २६ जि.प. सदस्यांविरोधात काँग्रेस करणार कारवाई!

२६ जि.प. सदस्यांविरोधात काँग्रेस करणार कारवाई!

Published On: Aug 11 2018 10:33PM | Last Updated: Aug 11 2018 10:33PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावर निवडून आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 26 सदस्यांना नोटिसा जारी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. त्यापाठोपाठ पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाल्याची माहिती पक्षाचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृहावर बोलत होते.

सध्या हा काँग्रेसच्या जि. प. सदस्यांचा गट स्वाभिमान पक्षासोबत आहे. औरंगाबाद खंडपीठाने असे गट अवैध ठरविले आहेत. त्यामुळे यांच्यावर कायदेशीर नोटीस बजावून कारवाईचा निर्णय पक्षाने घेतला आहे. 2017 सालच्या जि. प. निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर हे सदस्य निवडून आले होते. सावंतवाडी पंचायत समितीमध्ये 11 सदस्य, दोडामार्ग पंचायत समिती 2 सदस्य सावंतवाडी नगर परिषदेत 8 सदस्य वेंगुर्ले न. प. त पाच नगरसेवक काँग्रेसचे आहेत. ही कायदेशीर कारवाई काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याचे ते म्हणाले. बैठक जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत बूथ व कार्यकारिणी सक्षम करण्याबाबत चर्चा झाली. नाणार प्रकल्पाविरोधात ठराव करून तो राज्य व केंद्राला पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाच्या विरोधात 16 प्रकल्पग्रस्त गावांच्या ग्रामस्थांनी ठराव केला. तसा ठराव सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गावांतील ग्रामसभामधून ठराव घ्यावा, असे आवाहन केले आहे.