Tue, Nov 13, 2018 06:38होमपेज › Konkan › सावंतवाडी वनअधिकार्‍यांना होडावडे ग्रामस्थांचा घेराव 

सावंतवाडी वनअधिकार्‍यांना होडावडे ग्रामस्थांचा घेराव 

Published On: Apr 10 2018 10:33PM | Last Updated: Apr 10 2018 10:28PMसावंतवाडी : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा येथील रहिवासी सतीश गावडे (40) यांच्यावर गवारेड्याच्या कळपाने शनिवारी हल्ला केला होता. यामध्ये उपचारादरम्यान सोमवारी सांयकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयाला मंगळवारी (दि. 10) घेराव घालून तत्काळ मदतीची मागणी केली. यावेळी गावडे यांच्या वारसाला 1 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तर उर्वरित 7 लाख रुपये कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर दिले जाणार असल्याचे आश्‍वासन सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी लेखी स्वरूपात दिल्यानंतर ग्रामस्थांनी घेरावे मागे घेतला. होडावडे येथील सतीश जनार्दन गावडे हे शनिवारी सकाळी वेंगुर्ले एस. टी. डेपोत जाताना  तुळस कुंभारटेंब येथे गवारेड्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गेले दोन दिवस गोवा बांबुळी रुग्णालयात  उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. दोन दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाची खबर लागताच संतप्त झालेल्या होडावडावासीयांनी सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयाला घेरावे घातला.