Thu, Jul 18, 2019 21:59होमपेज › Konkan › घरात घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर

घरात घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात प्रौढ गंभीर

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:38PM

बुकमार्क करा

 संगमेश्‍वर : वार्ताहर 

घरात घुसलेल्या बिबट्याने गोविंद धोंडू कांबळे (वय 54) यांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार संगमेश्‍वर तालुक्यातील तांबेडी गौळवाडी येथे शनिवारी मध्यरात्री 12 वाजता घडला. जखमीवर रत्नागिरी येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

तांबेडीतील गौळवाडी येथील ग्रामस्थ बिबट्याच्या संचाराने हैराण झाले आहेत. याच वाडीत गोविंद कांबळे हे कुटुंबातील 7 सदस्यांसह राहतात. त्यांनी घरात 2 कुत्री पाळला आहेत. शनिवारी मध्यरात्री कुत्र्यांच्या वासावर आलेल्या बिबट्याने दरवाजात कुत्र्यांवर झडप घातली खरी; मात्र दरवाजा उघडला गेल्याने कुत्रा घरात पळाला व बिबट्या घरात घुसला. अचानक घडलेल्या घटनेने कांबळे कुटुंबीय जागे झाले. समोर बिबट्या पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली. यावेळी गोविंद कांबळे यांच्या बाजूला असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने पुन्हा झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून गेला आणि गोविंद कांबळे हे बिबट्याच्या तावडीत सापडले. बिबट्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला.

कुटुंबातील अन्य सदस्यांनी बिबट्यावर काठीने हल्ला केला. मात्र, तरीही बिबट्या गोविंद यांना सोडत नसल्याचे पाहून सर्वांनी आरडाओरड सुरू केली. सुमारे पाच मिनिटे बिबट्या व गोविंद यांची झुंज सुरू होती. शर्थीचे प्रयत्न करून त्यांनी आपली मान वाचवली. दरम्यान, कुटुंबीयांनी पुन्हा बिबट्यावर हल्ला केल्याने बिथरलेल्या बिबट्याने अखेर घरातून पळ काढला. गोविंद यांच्या डोक्याला  गंभीर जखमा झाल्या. त्यांच्यावर संगमेश्‍वरात प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या चार महिन्यांत बिबट्याने माणसांवर हल्ला करण्याची तालुक्यातील ही चौथी घटना ठरली आहे.