Fri, Jan 18, 2019 10:53होमपेज › Konkan › संगमेश्‍वरातील सोनवी पुलाची तपासणी

संगमेश्‍वरातील सोनवी पुलाची तपासणी

Published On: Mar 10 2018 11:02PM | Last Updated: Mar 10 2018 8:34PMसंगमेश्‍वर : वार्ताहर

संगमेश्‍वरातील सोनवी पुलाची सुरक्षा ऐरणीवर आली असतानाच महामार्ग विभागाने बांधकाम विभागाच्या सहाय्याने सोनवी पुलाची नुकतीच पाहणी केली. यांत्रिकी पाहणीत पुलाचे बांधकाम मजबूत असून केवळ कठडेच धोकादायक असल्याचा निर्वाळा बांधकाम विभागाने केला आहे. कठड्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच कार्यवाही होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

संगमेश्‍वर तालुक्यातील आरवली गडनदी पूल हा 1939 ला, शास्त्री 1940, सोनवी 1937, सप्तलिंगी 1940 तर बावनदी पुलाची उभारणी 1925 साली करण्यात आली आहे. ब्रिटिशांच्या गॅमन इंडिया कंपनीने हे पूल उभारले. यातील आरवली वगळता उर्वरित पुलांची डागडुजी व रुंदीकरण करणेही महामार्ग विभागाला जमलेले नाही. ब्रिटिश भारतातून जाऊन अनेक वर्षे होऊन गेली आहेत. शिवाय ब्रिटिशांनी बांधलेल्या तंत्रानुसार या पुलांचे आयुर्मान 60 वर्षे एवढेच ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त वर्षे होऊनही याकडे लक्ष दिले जात नाही. 

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असताना संगमेश्‍वरातील सोनवी पुलाकडे दुर्लक्ष होत होते. पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे कमकुवत झाले आहेत तर पुलावरून एखादे अवजड वाहन गेल्यास त्याचा कंप बाजारपेठेपर्यंत पोहोचत होता. गेले काही महिने याबाबत व्यापारी ओरड करीत असताना बांधकाम किंवा महामार्ग विभाग याकडे लक्ष देत नव्हता. यानंतर महामार्ग विभागाने बांधकाम विभागाची मदत घेत नुकतीच सोनवी पुलाची पाहणी केली.