Tue, May 21, 2019 18:38होमपेज › Konkan › संगमेश्‍वरला पाणीटंचाईची मोठी झळ

संगमेश्‍वरला पाणीटंचाईची मोठी झळ

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 22 2018 10:19PMसंगमेश्‍वर : वार्ताहर

वाढलेली उष्णता, खडखडाट झालेली नदीपात्र, जमिनीतील पाण्याची खालावत चालेली पातळी यामुळे संगमेश्‍वर तालुक्यात याच महिन्यात पाणीटंचाईला सुरूवात होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने यासाठी संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये 23 गावांतील 45 वाड्यांचा समावेश आहे.

गेली दोन वर्षे तालुक्यात पावसाचे प्रमाण विस्कळीत आहे. गतवर्षी पावसाने जेमतेम सरासरी गाठली होती. मात्र, लांबलेल्या पावसाने थोडा दिलासा मिळाला होता. गेल्या 7 वर्षांत तालुक्यात मार्च महिन्यातच टंचाईला सुरूवात होते आणि पहिला टँकर धावतो हा इतिहास आहे. या वर्षी मार्चचा दुसरा पंधरवडा संपत आला तरीही टंचाईने डोके वर काढले नसले तरीही ती कोणत्याही क्षणी निर्माण होऊ शकते, अशी स्थिती आहे.

तालुक्यात या वर्षी टंचाईचा संभाव्य कृती आराखडा प्रशासनातर्फे तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार 23 गावांतील 45 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. यासाठी 4 लाख 50 हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्याचबरोबर नळपाणी दुरुस्तीसाठी 15 लाख 50 हजार, विंधन विहिरीसाठी 6 लाख अशी एकूण 26 लाख रुपयांचा निधी आवश्यक असून तशी मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे. या आराखड्याला अंतिम मंजुरीही देण्यात आली आहे.

गतवर्षी 37 गावांतील 88 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र, या वर्षीच्या आराखड्यानुसार या गावातील वाड्यांमध्ये घट झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मे अखेरीस ही संख्या वाढणार हे निश्‍चित आहे. या आराखड्यामध्ये पाचांबे, पुर्ये तर्फे देवळे, बेलारीखुर्द, कातुर्डीकोंड, भडकंबा, शेनवडे, निवधे, कुटगिरी, तुरळ, दख्खन, असुर्डे साखरकोंड, करजुवे, निवळी, फुणगूस, कांटे, काटवली, कोसुंब, माभळे, भिरकोंड, फणसवळे, देवळे, विघ्रवली, मासरंग या गावातील 45 वाड्यांचा समावेश आहे. गतवर्षी दख्खन धनगरवाडीला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. या वाडीमध्ये रस्ता नसल्याने टँकरनेही पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही. या वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी 5 ते 6 कि. मी. इतकी भटकंती करावी लागली होती.