Tue, Jul 23, 2019 06:16होमपेज › Konkan › वाळू व्यावसायिकांच्या गाड्या जानवलीत रोखल्या

वाळू व्यावसायिकांच्या गाड्या जानवलीत रोखल्या

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:06AM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी
 कोल्हापूर जिल्हा ट्रक वाळू वाहतूक संस्थेने सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिकांचे डंपर, ट्रक कोल्हापूर जिल्ह्यात वाळू विक्रीस येऊ नये, कोल्हापूर जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांचे ट्रक, डंपर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाळू वाहतूक करून नेतील, असे धोरण अवलंबले. त्यामुळे  शनिवारी कणकवली तालुका डंपर चालक-मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कोल्हापूर येथील संघटनेच्या अध्यक्षांशी  संपर्क साधला असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे कणकवली तालुका डंपर ट्रक चालक-मालक संघटनेने शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रक  जानवलीत अडविले. 
दरम्यान, आ. नितेश राणे यांनी याप्रकरणी कोल्हापूर जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून दोन्ही संघटनांनी आपसात तडजोड करून हा प्रश्‍न मार्गी लावण्याची सूचना 
केली.  
त्यानुसार मंगळवार 17 जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्हा ट्रक वाळू वाहतूक संघटेनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी कणकवली येथे येऊन बैठक घेण्याचे मान्य केले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील वाहने सोडण्यात आली. 
हॉटेल नीलम कंट्रीसाईड येथे आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला कणकवली तालुका डंपर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.यशवंत सावंत, खजिनदार गंगाराम चौगुले, चिरे खाण संघटना खजिनदार नरहरी लिंग्रस, राष्ट्रवादीचे युवा नेते अबिद नाईक, राजेश ऊर्फ  सोनू सावंत, प्रदीप मांजरेकर, दामोदर सावंत, बाळा परब, दिलीप मर्ये, रूपेश जाधव, रोहित राजिवडेकर, आबा सावंत, संजय खानोलकर, रामचंद्र घाडी, विजय कदम, चिरे खाण उपाध्यक्ष महेश सावंत, राजा पवार, मिलिंद  केळूसकर, नागेंद्र मेस्त्री, मिलिंद चिंदरकर, राजू मिर, अनिस नाईक आदी उपस्थित 
होते.
पश्‍चित महाराष्ट्रातील वाळू उत्खननावर राष्ट्रीय हरित लवादाची बंदी आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांचे अनेक ट्रक गेल्या दोन महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाळू वाहतूक करून कोल्हापूर जिल्ह्यात विक्री करत आहेत. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातील सुद्धा काही वाळू व्यावसायिक कोल्हापूर जिल्ह्यात वाळू विक्री करत 
आहेत.