Wed, Jul 08, 2020 01:29होमपेज › Konkan › रायगडच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणार : संभाजीराजे 

रायगडच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणार : संभाजीराजे 

Published On: Jan 10 2018 1:35PM | Last Updated: Jan 10 2018 1:35PM

बुकमार्क करा
महाड : प्रतिनिधी 

साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडची त्या पद्धतीने पुनर्बांधणी पूर्ण पुराव्याअभावी अशक्य असल्याचे खासदार संभाजीराजेंनी स्पष्ट केले.  तसेच या   ऐतिहासिक  किल्ल्याची  देखभाल आणि डागडूजी आपण तज्ज्ञ मंडळींच्या देखरेखीखाली वेळात पूर्णत्वास नेणार असल्याची ग्वाही दिली. 

रायगड प्राधिकरण अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काल प्रथमच महाड शहरात खासदार संभाजीराजेंनी स्थानिक पत्रकारांशी सरकारी विश्रामगृहात संवाद साधला. यावेळी त्यांनी रायगड संवर्धनाबाबतची आपली भूमिका व सरकारचा दृष्टिकोन  स्पष्ट केला.

साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी घेतलेल्या किल्ल्यांच्या निवडीबाबत मत व्यक्त करताना त्यांनी किल्ले रायगड हा रांगडा किल्ला असल्याचे सांगितले. या किल्ल्याची पुर्नउभारणी असलेल्या स्थितीमध्येच करण्याकरिता ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या किल्याची असलेल्या स्थितीत दुरुस्ती करून त्याचे ऐतिहासिकपण लोप पावणार नाही याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्र सरकारने रायगड संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी निवड करून आपल्याला एक आव्हानात्मक काम दिले आहे. आपण ही जबाबदारी तमाम शिवभक्तांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेऊ असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला. रायगड संवर्धन मोहिमेकरता जाहीर झालेल्या  ६०६ कोटी पैकी १०६ कोटी रुपयांचा निधी प्राथमिक स्तरावर मंजूर झाला आहे. या यापैकी ७० कोटी रुपये रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या या संदर्भातील खात्यांमध्ये जमा झाले आहेत. 

 किल्ले रायगडाचा इतिहास आजही अनेक कारणानी दबला गेला असल्याचे सांगून हा सर्व इतिहास शिवभक्ताने समोर आणण्याचे प्रयत्न आपण करणार असल्याने या संदर्भात महाराष्ट्रासह देशातील ज्या शिवभक्त नागरिकांकडे ऐतिहासिक दस्ताऐवज असतील तरी ते रायगड प्राधिकरणाच्या ताब्यात द्यावेत असे आवाहन त्यांनी केले औरंगाबादचे असलेल्या पुरातत्व खात्याच्या अधिकार कक्षामध्ये असलेल्या अनेक दस्त आपण रायगडला आणणार असल्याचीही माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.

संभाजीराजेंनी किल्ले रायगडवरील नाना दरवाजा ते मशीद मोर्चा हा मार्ग, तसेच व्हागया दरवाजाकडे जाण्याचा मार्ग नैसर्गिक ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. किल्ल्यावरील अनेक ठिकाणी होणारी दुरुस्ती इतिहासाला धक्का लावणारी नसेल याकडे आपण प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे सांगितले. 

किल्ले रायगडाच्या परिसरातील एकवीस गावांना  तसेच छत्रपती शिवरायांना त्यांच्या कार्यकाळात मदत करणाऱ्या सरदारांच्या ऐतिहासिक वास्तू, गावांचे जतनकरण्यासाठी रायगड संवर्धन योजनेच्या माध्यमातून आणि आपल्या खासदार निधीमधून आपण सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले 

रायगडच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी ऐतिहासिक क्षेत्रातील तसेच  पुरातत्व खात्यातील नामवंत अधिकारी, वास्तुविशारदांशी संपर्कात असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडचा संपूर्ण विकास करण्याची वचनबद्ध असल्याची ग्वाही संभाजीराजेंनी दिली.