Sat, Mar 23, 2019 18:17होमपेज › Konkan › ‘कोकणचा साज संगमेश्‍वरी बाज’चे कौतुक

‘कोकणचा साज संगमेश्‍वरी बाज’चे कौतुक

Published On: Jun 17 2018 10:27PM | Last Updated: Jun 17 2018 10:17PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

मुलुंड येथे 98 व्या नाट्यसंमेलनात ‘कोकणचा साज संगमेश्‍वरी बाज’च्या टीमने केलेल्या सादरीकरणाने नाट्य कलावंत भारावले. पहाटे 5 वाजता सुरू झालेला कार्यक्रम दीड तास चालला. या कालावधीत टाळ्यांच्या गजराने नाट्यगृह दुमदुमले. कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर अनेक दिग्गज कलावंतांनी आमच्यासोबत घेतलेली सेल्फी हीच आमच्या चांगल्या कामाची पोचपावती ठरल्याची प्रतिक्रिया या कार्यक्रमातील कलावंतांनी दिली.

नाट्य परिषदेच्या कार्यालयात रविवारी सकाळी पत्रकार परिषदेला कलाकारांसह समीर इंदुलकर, सनातन रेडीज, प्रफुल्ल घाग, सौ. पूजा बावडेकर, श्याम मगदूम, विजय साळवी उपस्थित होते. या सर्वांनीच नाट्य परिषदेचे शाख्यध्यक्ष उदय सामंत, कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यामुळेच मुंबईत कार्यक्रमाची संधी मिळाल्याचे या कलाकारांनी आवर्जून सांगितले. 

मुलुंड येथे 98 व्या नाट्यसंमेलनात कोकणचा साज संगमेश्‍वरी बाजच्या टीमने रसिकांच्या प्रचंड टाळ्या व शिट्या घेतल्या. कोकणातील जाखडी, नमन व त्यातील गणपती, संकासूर, गणगवळण, कृष्ण ही पात्रं दाखवली. अ. भा. नाट्य परिषदेत सत्तांतर झाले व त्यानंतरचे हे पहिले संमेलन होते. सलग 60 तास कलाविष्कार या संकल्पनेत लोककलांना प्राधान्य देण्यात आले. पहाटे 5 ते 6.30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाला. या वेळी नाट्यसृष्टीतील प्रसाद कांबळी, सुकन्या मोने, शरद पोंक्षे, संतोष पवार, अविनाश नारकर, मधुरा वेलणकर, मंगेश कदम आदी उपस्थित होते. संगमेश्‍वरी बोलीचा हा 112 वा प्रयोग होता. मृदंगाच्या तालावर सुरुवात केल्यापासून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळू लागल्या. संकासूर प्रेक्षकांतून आणल्यानंतर प्रेक्षकही त्याच्यासोबत नाचले. बाळकृष्णाचे पात्र रंगवणार्‍या आठ वर्षीय रुद्र बांडागळे याला प्रेक्षकांकडून रोख पारितोषिके मिळाली. या कार्यक्रमात नमनातील गणपती सोंग, संकासूर, गौळणी दाखविण्यात आल्या. जुनी आणि नवीन जाखडी दाखविण्यात आली. सुमारे अडीच तासाचे लोकनाट्य असून, नाट्यसंमेलनात ते दीड तासात प्रेक्षकांसमोर सादर केले गेले. परंतु यालाही रसिकांच्या टाळ्या पडल्या. दीड तासाच्या प्रयोगात तब्बल पंधरा मिनिटे रसिकांनी टाळ्या वाजवून कलाकारांचे कौतूक केले, असेही यावेळी कलाकारांनी सांगितले.