Thu, Jun 27, 2019 12:19होमपेज › Konkan › साहिलने साकारली ‘शिवशाही’!

साहिलने साकारली ‘शिवशाही’!

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 10:53PMरत्नागिरी : विशाल मोरे

जन्मतःच त्याला ऐकू आणि बोलता येत नाही. मात्र, अशा परिस्थितीत नाऊमेद न होता सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्याला जीवन जगता यावे, यासाठी त्याच्या पालकांनी अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात त्याचे नाव नोंदवले. आज तो इयत्ता आठवीत शिकत आहे. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर सभोवताली घडणार्‍या गोष्टींचे त्याला नेहमीच कुतूहल वाटते. याच औत्सुक्यातून प्रवाशांचे आकर्षण ठरलेल्या एसटीच्या ‘शिवशाही’बसची प्रतिकृती त्याने हुबेहूब साकारून पालक, शिक्षक आणि नातेवाईकांची शाबासकी मिळवली. साहिल महेंद्र खानविलकर हे त्याचे नाव. शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम मागील कर्लेकरवाडी येथे तो राहतो. त्याचे वडील व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. एके दिवशी शाळेत येताना त्याने आपल्या सोबत मोठा बॉक्स आणला होता. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही या बॉक्समध्ये काय दडलयं याचे कुतूहल वाटत होते. प्रार्थना झाल्यावर त्याने तो बॉक्स उघडला आणि त्यातून एसटीच्या शिवशाही बसचे मॉडेल बाहेर काढले. त्याने बनविलेले हे मॉडेल पाहून सर्वांनी त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. 

मोबाईलवर ‘शिवशाही’ बसचा फोटो पाहून त्याने हे मॉडेल तयार केली आहे. हेडलाईट, टेललाईटसह ही बस बॅटरीवर मागेपुढेही चालते. याबसवरील अक्षरे त्याने रेडियमच्या सहाय्याने काढली आहेत. यासाठी त्याला 8 दिवसांचा कालावधी लागला. हे मॉडेल केवळ बाह्याकृती स्वरुपात न बनवता ज्याप्रमाणे गाडीची चेसी असते. तशी त्याने चेसीही बनवली आहे. दोन बॅटरींवर ही गाडी चालते. यासाठी त्याला पाचशे रुपयांचा खर्च आला. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्याचे जीवन नसले तरी आपल्यातील कलागुणांनी त्याने आपले जीवन सुंदर बनवले आहे. गणेशोत्सवात घरातील गणेशमूर्ती तो स्वतःच तयार करतो. त्याने बनविलेली बाहुबलीच्या रुपातील गणेशमूर्ती शाळेने संग्राह्य ठेवली आहे. नगरपरिषदेच्या शाळांमध्ये त्याने आकाश कंदिल बनवण्याचे प्रात्यक्षिकही दाखवले .आहे.